अंबाबाई मंदिराजवळील पुतळा : फेरीवाले, गजरेवाले, ओटीवाल्यांसह केबिनचा अडथळा : अतिक्रमण हटविण्याची परीट समाजाची मागणी : उपायुक्तांना निवेदन
प्रतिनिधी/कोल्हापूर
अंबाबाई मंदिराजवळ असणाऱया राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या पुतळय़ाभोवती झालेल्या अतिक्रमणामुळे पुतळा शोधण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पुतळा परिसरातील अतिक्रमण महापालिकेने तातडीने काढावे, तसेच पुतळा परिसराचे प्रलंबित असलेले सुशोभिकरणाचे कामही तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी आहे. कोल्हापूर परीट समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
परीट समाजाचे अध्यक्ष प्रकाश भालकर, सचिव उदय भालकर, माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक वसंतराव वठारकर, दीपक भालकर, महेश खडके, महिला मंडळ उपाध्यक्ष सौ.कविता भालकर यांच्या शिष्टमंडळाने महापालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तसेच वस्तुस्थितीची माहितीही सांगितली.
या संदर्भात माहिती देताना वसंतराव वठारकर यांनी सांगितले, संत गाडगे महाराजांचा अंबाबाई मंदिराजवळील पुतळा सर्वांना प्रेरणा आणि ऊर्जा देणारा आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात येणारा भाविक गाडगे महाराजांच्या पुतळय़ालाही अभिवादन करत असतो, पण गेल्या काही दिवसांपासून या पुतळय़ांसमोर अतिक्रमण वाढू लागले आहे. दुचाकी वाहने लावली जातात. त्याचबरोबर फेरीवाले, गजरेवाले, प्रसाद विकणारे आणि केबिन थाटलेले विक्रेते यांनी अतिक्रमण केल्याने पुतळा येणाऱया नागरिकांना दिसत नाही. या संदर्भात अतिक्रमण करणाऱयांना समजविण्यास गेल्यानंतर त्यांच्याकडून उर्मट भाषा वापरली जाते. महापालिकेने तातडीने कारवाई करून गाडगे महाराजांचा पुतळा अतिक्रमणमुक्त करावा, अशी आमची मागणी आहे. तसेच पुतळा परिसर सुशोभिकरणाचे जे काम अपूर्ण आहे, ते देखील तातडीने पूर्ण करावे, असेही आम्ही उपायुक्त दरेकर यांना सांगितले.
कोल्हापूर परीट समाजाच्या वतीने श्री राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे, व श्री संत गाडगे महाराज चौक परिसरात झालेले अतिक्रमण कायमस्वरूपी काढणेबाबत व श्री संत गाडगेबाबा पुतळा सभोवताली सुशोभिकरण कामाची पूर्तता लवकरात लवकर होणेबाबतचे निवेदन कोल्हापूर महापालिका उपायुक्त मा.शिल्पा दरेकर यांना देण्यात आले.याबाबत योग्य ती कार्यवाही करू असे त्यांनी सांगितले. हे निवेदन अध्यक्ष प्रकाश भालकर,सचिव उदय भालकर, धडाडीचे जेष्ठ माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक वसंतराव वठारकर ,दिपक भालकर ,महेश खडके,महिला मंडळ उपाध्यक्ष सौ.कविता भालकर यांनी दिले.