ऑनलाईन टीम/तरुण भारत
गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती, असं विधान केलं. त्यावरून वाद चालू असताना सावरकरांचे नातू रणजीत सावरकर (Ranjeet Savarkar) यांनी “एका महिलेसाठी नेहरूंनी देशाची फाळणी केली”, असं वक्तव्य केलं. हे वाद ताजे असतानाच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या पिढीचे आदर्श होते. आता पवार आणि गडकरी हे नव्या पिढीचे आदर्श आहेत, असं वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडलं आहे. यांनतर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. असं असतानाच आता गडकरींनी या प्रकरणावर सूचक विधान केलं आहे.
नितीन गडकरी यांच्या कार्यालयीन ट्विटर हॅण्डलवरुन एक ३० सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये नितीन गडकरी हे भावनिक स्वरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना दिसत आहेत. “छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे हो! आमच्या आई-वडिलांपेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्यांचं जीवन आमचं आदर्श आहे,” असं गडकरी या व्हिडीओमध्ये महाराजांबद्दलच्या भावना व्यक्त करताना म्हणतात.
पुढे व्हिडिओमध्ये गडकरींनी, “यशवंत! कीर्तिवंत! वरदवंत! सामर्थ्यवंत! जाणता राजा!! निश्चयाचा महामेरु ! बहुत जनासी आधारू ! अखंडस्थितीचा निर्धारु ! श्रीमंत योगी !!,” असं गडकरी अगदी हातवारे करुन म्हणत आहेत. तसेच हसून त्यांनी, “डीएड-बीएड करणारा राजा नव्हता, वेळ पडली तर आपल्या मुलालाही कठोर शिक्षा देणारा राजा होता,” असंही महाराजांबद्दल म्हटलं आहे. “छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत,” असं कॅप्शन टाकत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
काय म्हणाले होते कोश्यारी?
“आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.