शहरातील विविध रस्त्यांची दुरवस्था : गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्याची मागणी करूनही दुर्लक्षच
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली असून गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. महाद्वाररोड परिसरातील मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झाला असून ठिकठिकाणी निर्माण झालेल्या खड्डय़ांमुळे वाहनधारकांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे. या रस्त्याची दुरुस्ती कधी होणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
शहर व उपनगरातील रस्त्यांची दाणादाण उडाली असून बाजारपेठेसह शहर व उपनगरातील सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने या रस्त्यावरूनच गणरायांचे आगमण होणार का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी पूर्ण करावी, अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला तरी रस्त्यांच्या दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पाटील गल्लीसह काही प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेकडून करण्यात येत आहे. पेव्हर्सच्या आधारे खड्डे बुजविले जात आहेत. मात्र हे काम व्यवस्थित होत नसल्याचेही निदर्शनास आले आहे.
तसेच भांदूर गल्लीसह महाद्वाररोड परिसरातील विविध रस्ते खराब झाले असून येथील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. खड्डय़ांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. विशेषतः उड्डाणपुलाखालून महाद्वाररोडला येताच भलामोठय़ा खड्डय़ाचा सामना करावा लागत आहे. परिणामी या ठिकाणी अपघातही घडत आहेत. येथील संपूर्ण रस्त्यांची वाताहत झाली असून खड्डेमय रस्त्यावरूनच गणपती बाप्पांचे आगमण होणार का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत. येथील रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.