मूर्ती रंगवण्याच्या कामाला जोर : मूर्ती सुकल्याने रंगकाम सुकर : गोकुळाष्टमीनंतर सार्वजनिक मंडपांच्या उभारणीस प्रारंभ
खानापूर : गणेश चतुर्थी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरासह तालुक्यातील गणेश मूर्तिकार आपल्या कार्यशाळेत मूर्ती रंगवण्याच्या कामात गर्क झाले असून गणपती रंगवण्याच्या कामाची लगबग कार्यशाळेतून दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याने मूर्तिकारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून मूर्त्या पूर्णपणे सुकल्याने गणेशमूर्त्या रंगवण्याचे काम सुकर बनले आहे. खानापूर शहर आणि तालुक्यातील मूर्तिकार गणेशमूर्तीना अंतिम स्वरुप देण्याच्या कामात व्यस्त झाले असून मूर्ती रंगवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने गणेशमूर्तीना सुकविण्यासाठी इतर खटाटोप करावा लागणार नसल्याने मूर्तिकार मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्याच्या कामात व्यस्त आहेत. गणेशचतुर्थी अवघ्या 15 fिदवसांवर येऊन ठेपल्याने मूर्तीच्या रंगरंगोटीची कामे जोरदार सुरू आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप गोकुळाष्टमीनंतर उभारणार आहेत.
मोठ्या सार्वजनिक मूर्ती कोल्हापूरहून
खानापूर तालुक्यात प्रामुख्याने खानापूर शहर तसेच ग्रामीण भागात शेकडो मूर्तिकार आहेत. त्यापैकी खानापूर, नागुर्डा, गर्लगुंजी, सिंगीनकोप गावातील मूर्तीना बेळगाव, हुबळी, धारवाड, कारवार भागात अधिक मागणी आहे. अलीकडे काहीनी मोठ्या सार्वजनिक मूर्ती कोल्हापूरहून आणून त्यावर आपली कला साकारतात. पूर्वी खानापूरला केवळ शाडू आणि चिखलाच्या मूर्ती बनवण्याची प्रथा होती. हल्ली कारागिरांना शाडूच्या मूर्ती परवडणाऱ्या नसल्याने बऱ्याच कारागिरांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवत आहेत.
चित्रगार कुटुंबीयांचा आजही शाडूच्या मूर्ती बनविण्यावर भर
खानापूर शहरात चित्रगार कुटुंबीय आजही आपल्या मूर्ती बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय जोपासत आहेत. या घराण्यापैकी उमेश चित्रगार, बाबू चित्रगार यांनी आपली मूर्ती बनवण्याची परंपरा अव्याहतपणे चालू ठेवली आहे. त्या कुटुंबांनी मात्र अजूनही शाडू मातीच्या मूर्तीवरच आपला भर दिला आहे. याशिवाय राजू कुंभार, जोतिबा कुंभार, गजानन कुंभार, दत्ता कुंभार, बाळासाहेब सावंत हे देखील मूर्ती कलाकार आजही आपला व्यवसाय सांभाळून आहेत.
पुढील आठवड्यात खरेदीसाठी उडणार झुंबड
पुढील आठ दिवसात शहरात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी झुंबड उडणार आहे. व्यवसाय व नोकरीनिमित्त गोवा, कोल्हापूर, इंचलकरंजी, रत्नागिरी, कराड, सातारा, पुणे, इस्लामपूर यासह इतर ठिकाणी असलेले खानापूरवासीय गणपती सणासाठी आपल्या गावी येतात. त्यामुळे गणेशोत्सव काळात ग्रामीण भागासह शहरात मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून येते.
खानापूर शहरात जवळजवळ 11 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे
खानापूर शहरात जवळजवळ 11 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यामध्ये बालमंडळ गणेशोत्सव देसाई गल्ली, व्यापारी मंडळ बाजारपेठ, महाराष्ट्र युवक मंडळ स्टेशनरोड, महालक्ष्मी गणेश मंडळ स्टेशनरोड, चव्हाटा गणेश मंडळ निंगापूर गल्ली, गणेश युवक मंडळ केंचापूर गल्ली, चौराशी गणेशोत्सव चौराशी गल्ली, रेल्वे स्टेशन विद्यानगर गणेशोत्सव मंडळ, मेदर गल्ली गणेशोत्सव मंडळ तसेच हलकर्णी-गांधीनगर व ऊमेवाडी क्रॉस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा प्रामुख्याने समावेश आहे. या मंडळांच्या मंडप उभारणीला गोकुळ अष्टमीला मुहूर्तमेढ करून सुऊवात होणार आहे.
गर्लगुंजीतही दहा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे
गर्लगुंजी गावातही जवळजवळ दहा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून त्यांचीही तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. याशिवाय खानापूरच्या काही शासकीय कार्यालयातही पाच दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. त्या ठिकाणी उत्सवाची तयारी सुरू आहे. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खाते, तहसीलदार कार्यालय, हेस्कॉम कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस प्रशिक्षण केंद्र, केएसआरटीसी आदी कार्यालयांचा समावेश आहे.
मकर सजावटीचे साहित्य बाजारात दाखल
यावर्षी समाधानकारक पाऊस होत असल्याने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडणार असल्याचे दिसून येत आहे. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी गणेशचतुर्थीच्या साहित्याची आरास आतापासूनच सुरू केली आहे. किराणा तसेच मकर सजावटीचे साहित्य आतापासूनच बाहेर दुकानदारांनी विक्रीसाठी लावलेली दिसून येत आहे. तसेच शहरातील कापड दुकानदारांनीही आपल्या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. बाजारात फेरफटका मारला असता यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून वर्गणी जमा करण्याच्या कामात कार्यकर्ते गुंतलेले आहेत. पुढील काही दिवसात मंडप उभारणीस सुरुवात होणार आहे.