गणेश मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात : भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी
► प्रतिनिधी/ बेळगाव
बुद्धीची देवता असणाऱ्या गणेशाची जयंती बुधवारी शहर परिसरात अत्यंत श्रद्धेने साजरी करण्यात आली. शहरातील सर्व गणेश मंदिरांमध्ये यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांनी गणेश दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.
अनगोळ नाका येथील स्वयंभू गणेश मंदिरामध्ये सकाळी 6 वाजता काकडारती, 7 वाजता महाअभिषेक, 9 वाजता महागणहोम, 10 वाजता गणहोम, 12 वाजता पाळणा व 4 वाजता सत्यनारायण पूजा झाली. सुलभा भोसले, रेणूका कदम आणि अन्य महिलांनी पाळणा सादर केला. अनुराधा व रमेश गवळी यांनी सत्यनारायण पूजेचे यजमानपद स्वीकारले. सर्व भाविकांना खिरीचा प्रसाद देण्यात आला.
उत्सव यशस्वी करण्यासाठी दामोदर भोसले, शंकर शिंदे, सुरेश पाटील, राजीव जाधव, मारुती कदम, रमेश व कृष्णा गवळी, नेताजी हुंदरे, रामा जोशीलकर यांनी परिश्रम घेतले. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
चन्नम्मानगर
राणी चन्नम्मानगर येथील श्री गणपती व मारुती मंदिरांमध्ये गणेश जयंतीनिमित्त सकाळी सत्यविनायक पूजा, सत्यनारायण पूजा होऊन दुपारी 12 वाजता गणेशाला पाळण्यात घालण्यात आले. त्यानंतर महामंगलारती, मंत्रपुष्प व पूर्णाहुती झाल्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी 5 वाजता महिलांसाठी तिळगूळ कार्यक्रम पार पडला. पूजेचे यजमानपद सुधा व सुधीर शिरवाडकर यांनी स्वीकारले. दीनानाथ कुलकर्णी व संतोष दीक्षित यांनी पौरोहित्य केले.
कामत गल्ली
कामत गल्ली, स्थळ देवस्थान येथे गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अभिषेक, आरती व पाळण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी बामणेकर, वैशाली यल्लाळ, उमा पवार, लता पवार, भारती जाधव, गरडे, राजश्री रजपूत, कडोलकर, जाधव, खटावकर, नागेश पवार, विश्वनाथ लोहार, अनिल बडमंजी, रवी पावले, ओमकार खानापुरी यांच्यासह अनेक भक्तांनी यावेळी गर्दी केली होती.
भवानीनगर
भवानीनगर, मंडोळी रोड येथील गणेश मंदिर ट्रस्टतर्फे बुधवारी मंदिरात काकडारती, पुण्याहवाचन, गणहोम, अभिषेक व अलंकार, महानैवेद्य, महाआरती व महिलांसाठी तिळगूळ समारंभ पार पडला. दुपारी 1 वाजता आयोजित केलेल्या महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.
गणाचारी गल्ली
श्री बकरी गणपती मंदिर, ट्रस्ट बकरी मंडई, गणाचारी गल्ली तसेच सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, जी. जी. बॉईज, श्री रेणूका देवी महिला मंडळ, गणाचारी गल्ली यांच्यातर्फे मंदिरामध्ये सकाळी धार्मिक कार्यक्रम झाले. सायंकाळी 7 वाजता महाआरती होऊन महाप्रसाद वितरित करण्यात आला.
याचप्रमाणे हिंडलगा गणपती मंदिर, चन्नम्मा सर्कल गणेश मंदिर, शहापूर येथील सिद्धिविनायक मंदिर व गणपती मंदिर, हरिद्रा गणपती मंदिरसह अनेक गणेश मंदिरांमध्ये गणेश जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त मंदिरांच्या प्रवेशद्वाराजवळ श्रीफळ आणि फुले विक्रेत्यांनी गर्दी केली होती.