कोरोनाकाळात लागू केलेले नियम मागे : महसूलमंत्री आर. अशोक यांची माहिती
प्रतिनिधी /बेंगळूर
कोरोनामुळे मागील दोन वर्षे धार्मिक उत्सव, सण कठोर नियमांच्या चौकटीत साधेपणाने करण्यात आले होते. मात्र, यंदा गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी गणेशोत्सव निर्बंधमुक्त असणार आहे. कोरोनापूर्वी जे नियम होते तेच यापुढेही लागू असतील, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री आर. अशोक यांनी दिले.
येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेंगळूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एक वॉर्ड एक गणपती बसविण्याचा आदेश दिला आहे. याविषयी महसूलमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यापूर्वी कोरोना परिस्थितीमुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी काही नियम लागू करण्यात आले होते. मात्र, यावेळी तशा प्रकारच्या नियमांचे बंधन असणार नाही. आपण याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोणत्याही मर्यादा किंवा निर्बंध असणार नाहीत. कोरोनापूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव ज्या पद्धतीने साजरा केला जात होता, तसाच यंदा देखील साजरा केला जाऊ शकतो. एक रस्ता, एक वॉर्ड-एक गणपती असा नियम राहणार नाही. महापालिकेने वॉर्डात एक गणपती असा आदेश दिला असेल, पण राज्य सरकारने निर्बंध घालण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती मंत्री आर. अशोक यांनी दिली.
प्लास्टिक किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याची मुभा नाही. पर्यावरणपूरक शाडूच्या किंवा मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन त्यांनी केले.
बेंगळूर मनपाच्या निर्णयामुळे निर्माण झाला होता गोंधळ
बेंगळूर महापालिकेचे आयुक्त तुषार गिरीनाथ यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन गणेशोत्सवातील नियमांची माहिती दिली होती. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही एका वॉर्डात एकच सार्वजनिक श्रीमूर्ती बसविण्याची मुभा देण्यात आली आहे. पीओपी मूर्ती तयार करून कोणीही विक्री करू नये. पर्यावरण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयांसमवेत धाडी टाकून कारवाई केली जाईल, अशा इशाराही दिला होता. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये नाराजी पसरली होती. राज्यातील इतर महापालिका, नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातही अशा प्रकारचे निर्बंध असतील का?, असा गोंधळ निर्माण झाला होता. अखेर सोमवारी महसूल मंत्र्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
चामराजपेठ येथील मैदानाबाबत स्पष्टीकरण
बेंगळूरच्या चामराजपेठ येथील मैदान महसूल खात्याची मालमत्ता आहे. येथे धार्मिक आचरणासह उत्सवांना परवानगी द्यावी की नाही, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार महसूल खात्याला आहे.
चामराजपेठ येथील मैदानावर स्वातंत्र्योत्सव साजरा करण्यासाठी अद्याप कोणतेही निवेदन आलेले नाही. स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी परवानगीची गरज नाही. मात्र, कायदा-सुव्यवस्थेला धक्का पोहोचेल अशा ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे चामराजपेठ येथील मैदानाविषयी सरकार योग्यवेळी योग्य निर्णय घेईल, असेही आर. अशोक यांनी सांगितले.