उच्च दाबाचा विद्युतप्रवाह होणाऱया तारांच्या ठिकाणी परवानगी नको
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनामुळे मागील दोन वर्षे गणेशोत्सव अनेक निर्बंधांच्या चौकटीत साजरा करण्यात आला. मात्र, यावेळी सरकारने हे निर्बंध शिथिल केले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यासंबंधी सरकारने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, पोलीस आयुक्तांना आदेशपत्रक पाठविले आहे. अर्ज सादर झाल्यानंतर सिंगल विंडो व्यवस्थेंतर्गत तीन दिवसांत परवानगी द्यावी, अशी सूचना केली आहे. राज्य सरकारचे अप्पर मुख्य सचिव डॉ. रजनीश गोयल यांनी मंगळवारी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.
गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी आवश्यक असणारे ठिकाण, मंडप, वीज कनेक्शन आदींच्या परवानगीसाठी महसूल, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, अग्निशमन, पोलीस खाते आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून एकत्रितपणे परवानगी देण्याकरिता ‘सिंगल विंडो’ (एक खिडकी) व्यवस्थेतंर्गत व्यवस्था करावी. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रत्येक वॉर्ड पातळीवर विविध खात्यांचे प्रतिनिधी नेमून सिंगल विंडो स्थापन करून प्रचार करावा. कार्यक्रमाच्या आयोजकांनी विहित नमुन्यातील अर्ज दाखल करावा. आयोजकांनी दाखल केलेल्या अर्जाची सर्व खात्यांनी संयुक्तपणे पडताळणी करून तीन दिवसांत नियमानुसार परवानगी द्यावी, अशी सूचना सरकारने दिली आहे.
गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यापूर्वी त्यांच्याकडून न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि सरकारच्या विविध खात्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यासंबंधी हमीपत्र घ्यावे. सार्वजनिक सुरक्षा आणि पर्यावरण प्रदूषण होणार नाही, अशा रितीने गणेशोत्सव साजरा होत आहे का, याची खातरजमा करून घ्यावी. त्याकरिता आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना गणेशोत्सव मंडळांना करावी, असेही सरकारने आदेशात म्हटले आहे.
विशेषतः उच्चदाबाचा विद्युतप्रवाह होणाऱया तारांच्या जवळ गणेशमूर्ती बसविण्यासाठी परवानगी देऊ नये. या बाबतीत कोणतीही तडजोड करू नये. उत्सवापूर्वी नागरिक समिती, मोहल्ला समिती, देखरेख समिती तसेच सर्व संघ-संस्थांच्या प्रमुखांना एकत्र आणून शांतता बैठक आयोजित करून सूचना द्याव्यात, अशी सूचनाही करण्यात आली आहे.