Tarun Bharat

कुंकळ्ळीचा गणेशोत्सव धार्मिक सलोख्याचे प्रतीक

डॉ. प्रकाश कुराडे यांचे उद्गार : कुंकळ्ळी – बाळ्ळी गणेशोत्सव मंडळाच्या देणगी कूपन विक्रीस प्रारंभ

प्रतिनिधी /कुंकळ्ळी

धार्मिक सलोख्याचे प्रतीक म्हणून कुंकळ्ळीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाकडे पाहता येईल. कुंकळ्ळीत गेल्या बारा वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जात आहे व त्याला सर्वधर्मियांचे उत्तम सहकार्य लाभले आहे, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे कुंकळळीतील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ डॉक्टर प्रकाश कुराडे यांनी कुंकळ्ळी-बाळ्ळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या संपर्क कक्षाचे उद्घाटन व देणगी कूपन विक्रीच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलताना केले.

यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक टोनी फर्नांडिस, बाळळी पंचायतीचे माजी सरपंच रोहिदास नाईक, युवा उद्योजक व मित्र प्रकाशनचे वैभव फोंडेकर, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ऑस्कर मार्टिन्स, विद्यमान अध्यक्ष सुनील फातर्पेकर, माजी अध्यक्ष कमलाक्ष प्रभुगावकर, सदस्या छाया गवंडळकर, संदेश नाईक, कृष्णा नाईक, नझीर शेख, स्वामी हिरेमठ व इतर मान्यवर उपस्थित होते.

डॉ कुराडे यांनी यावेळी गणेशोत्सव मंडळाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. मंडळाने गावात जे धार्मिक सलोख्याचे उदाहरण घालून दिले आहे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करून येथील कलाकारांना व मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मागील दोन वर्षे कोविड संकटामुळे विशेष कार्यक्रम करता आले नव्हते. यंदा मंडळाला संधी उपलब्ध झाली आहे. यंदा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी व्हावेत व त्याकरिता तमाम कुंकळ्ळीकरांनी, विशेष करून गणेशभक्तांनी मंडळाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. कुराडे यांनी पुढे बोलताना केले.

टोनी फर्नांडिस म्हणाले की, कुंकळळीत सर्व धर्मांचे लोक एकोप्याने राहतात व एकमेकांच्या उत्सवांत मोठय़ा आनंदाने सहभागी होतात. कुंकळ्ळी-बाळ्ळी गणेशोत्सव मंडळाच्या कार्याला तोड नसल्याचे सांगताना धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक कार्य मंडळाने हाती घेतल्याबद्दल त्यांनी मंडळ समितीचे कौतुक केले.. रोहिदास नाईक यांनीही मंडळाच्या उपक्रमांची प्रशंसा केली. सूत्रसंचालन सचिव विजयकुमार कोप्रे देसाई यांनी, तर कमलाक्ष प्रभुगावकर यांनी स्वागत केले आणि सुनील फातर्पेकर यांनी आभार मानले. मंडळाकडून नुकत्याच कुंकळ्ळीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांवर चर्चासत्र व अखिल गोवा पातळीवर गीतगायन स्पर्धा आयोजित करण्याचा बेत असून सविस्तर कार्यक्रम पुढील बैठकीत जाहीर करण्यात येणार आहे.

Related Stories

कोरोना ‘टिका उत्सव’ उत्साहात सुरु

Amit Kulkarni

‘लोकमान्य मॉडेल’चा व्यापक विस्तार व्हावा

Amit Kulkarni

बोगमाळोत गोळय़ा झाडून युवकाचा खून

Omkar B

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी वास्कोत 4 युवकांना अटक

Amit Kulkarni

राज्यात जानेवारीपासून रोजगार भरती

Patil_p

मुलांमधील गुणकौशल्यांना वाव देणारे शिक्षण हवे

Patil_p
error: Content is protected !!