3 अल्पवयीनांकडून मसीर्डिजमध्ये बलात्कार ः आरोपींमध्ये आमदाराचा पुत्र
वृत्तसंस्था/ हैदराबाद
हैदराबाद शहरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तीन अल्पवयीन मुलांनी मर्सिडीज कारमध्ये या मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे. आरोपींमध्ये एक जण आमदाराचा पुत्र असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी 11 वी-12 वीचे विद्यार्थी असून सर्वजण राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाचे सदस्य असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना 28 मे रोजी घडली आहे. मुलीच्या वडिलांनी बुधवारी 1 जून रोजी याप्रकरणी तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी भादंविचे कलम 354 आणि पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाच अटक करण्यात आलेली नाही
पबमध्ये हायप्रोफाइल पार्टी
28 मे रोजी 17 वर्षीय मुलगी एका हायप्रोफाइल पार्टीत सामील झाली होती. ही पार्टी तिचा मित्र सूरज आणि हादीने एम्नेशिया अँड इनसोम्निया पबमध्ये आयोजित केली होती. लाल रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये काही जणांनी मुलीला पबमधून बाहेर काढत अन्यत्र नेले होते. कारमधील लोकांनीच या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मुलीच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत. सामूहिक बलात्कारानंतर पीडित मुलीला मोठय़ा धक्का बसला आहे.
एका आरोपीची ओळख पटली
पोलिसांनुसार पार्टीत पीडित मुलीसोबत आमदाराच्या पुत्रासह अल्पसंख्याक मंडळाच्या अध्यक्षाचा मुलगा देखील सामील झाला होता. सध्या पीडित मुलगी केवळ एकाच आरोपीची ओळख पटवू शकली आहे. हा आरोपी देखील अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.