विक्रम गुर्जर उर्फ ‘लादेन’वर रुग्णालयातच गोळीबार : दोन महिला जखमी
अलवर / वृत्तसंस्था
राजस्थानमधील कुख्यात गुन्हेगार विक्रम गुर्जर उर्फ बिन लादेन याच्यावर गुरुवारी सकाळी बेहरोर जिल्हा रुग्णालयात गोळीबार करण्यात आला. गोळीबाराच्या या घटनेमुळे रुग्णालयात धावपळ आणि हाहाकार निर्माण झाला. या घटनेत लादेनला गोळय़ा लागल्या नसून, येथे उपचारासाठी आलेल्या दोन महिलांच्या पायाला गोळय़ा लागून त्या जखमी झाल्या. लादेनवर हल्ला करण्यासाठी 3 शुटर्स रुग्णालयात आल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. गोळीबारानंतर ते फरार झाले असून आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. टोळीयुद्धातून ही घटना घडल्याचा दावा करत तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे.
विक्रम उर्फ लादेनला दुपारी जवळपास बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी तपासणीसाठी रुग्णालयात आणले होते. त्याची वैद्यकीय चाचणी करून पोलीस कर्मचारी त्याच्यासोबत निघाले असतानाच तेथे असलेल्या हल्लेखोरांनी लादेनवर हल्ला चढवला. यावेळी पोलीस कर्मचाऱयावरही थप्पड मारण्यात आली. या हल्ल्याची कुणकुण लागताच विक्रमने समोरच्या एका खोलीत पळून जात स्वतःला वाचविले. हल्लेखोरांनी त्याच्या दिशेने तीन राऊंड फायर केल्या. मात्र, त्यांना अचूक लक्ष्य साधता न आल्याने बंदुकीच्या गोळय़ा तेथील रुग्णांना लागल्या. जखमी झालेल्या दोन महिलांवर रुग्णालयात इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
बिन लादेन आणि पापाला गुर्जर टोळीमध्ये परस्पर वैर आहे. साहजिकच गोळीबार करणारे पापाला टोळीतील शुटर्स असल्याचा संशय आहे. गोळीबार करून हल्लेखोर वेगाने पळून गेले. त्यापैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण शहरात आणि हरियाणा सीमेवर नाकाबंदी केली. मात्र, त्यांचा कोणताही मागमूस लागला नाही. लादेन आणि पापाला यांच्यातील वैरत्वाची पोलीस खात्याला पूर्ण कल्पना आहे. असे असूनही त्याला रुग्णालयात घेऊन जाताना केवळ तीन-चार पोलिसांचे संरक्षण दिल्याचे स्पष्ट झाले आहे. गँगस्टर विक्रम उर्फ लादेनला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार होते. त्यापूर्वी पोलिसांनी वैद्यकीय चाचणीसाठी त्याला रुग्णालयात आणले होते. बेहरोर पोलिसांनी विक्रम गुर्जर उर्फ लादेनला 2 जानेवारी रोजी प्रॉडक्शन वॉरंटवर जयपूर येथून हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणीसाठी गोळीबार केल्याप्रकरणी अटक केली होती. त्याच्यावर बेहरोरमध्ये 21, नीमरानामध्ये दोन आणि हरसोरामध्ये एक गुन्हा दाखल आहे. याशिवाय जयपूर ग्रामीण आणि भरतपूर जिह्यातही अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.