पुणे / वार्ताहर :
शिरुर तालुक्यातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. थंडीचे दिवस असल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचारी रात्रीच्या वेळी बाहेर न थांबता केबीनमध्ये झोपतात. ही बाब हेरून आरोपी पेट्रोल पंपांवर दरोडे टाकत होते.
करण युवराज पठारे (20, रा. गुजरमळा, शिरुर), रोहन सोमनाथ कांबळे (20, रा. बोऱहाडेमळा, शिरुर), अजय जगननाथ माळी (23, रा. श्रीगोंदा) आणि अजय सोमनाथ लकारे (21, रा.श्रीगोंदा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे अन्य दोन साथीदार फरार झाले आहेत.
अधिक वाचा : KYC च्या नावाखाली निवृत्त महिला प्राध्यापकास 20 लाखांचा गंडा
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी करण पठारे हा या टोळीचा मुख्य सुत्रधार आहे. त्याला साखर व्यवसायात सात ते आठ लाखांचे नुकसान झाले होते. हे नुकसान भरुन काढण्यासाठी त्याने वीटभट्टी कामगार असलेले लकारे आणि माळी तसेच आणखी तीन साथीदारांना हाताशी धरुन पेट्रोल पंपांवर दरोडे टाकण्याचा कट रचला. त्यांनी 12 नोव्हेंबरला शिरुरमधला श्री शिवसाई फ्युअल स्टेशन हा पेट्रोल पंप लूटला. कोयत्याचा धाक दाखवून तेथील 49 हजाराची रोकड चोरली. यानंतर 15 नोव्हेंबरला न्हावरा गावच्या हद्दीतील आयओका पेट्रोल पंपावर दरोडा टाकून 1 लाख 2 हजाराची रोकड चोरली. सलग दोन दरोडे एकाच तालुक्यात पडल्याने पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरुर पोलिसांची पथके तयार केली. त्यांनी तांत्रिक माग व खबऱ्यांकडून माहिती मिळवून चौघांना अटक केली. आरोपींकडून गुन्हयात वापरलेले कोयते हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांच्या दोन फरार साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. अधिक तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत करत आहेत.