भोपाळ / वृत्तसंस्था
दोन दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये टोळीयुद्धात जखमी झालेला भोपाळचा फरार गुंड मुख्तार मलिक याचा शुक्रवारी मृत्यू झाला. टोळीयुद्धानंतर गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांनी मुख्तारला रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी सकाळी 10 वाजता त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर अनेक पोलीस ठाण्यात 58 गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुख्तार मलिक बुधवारी जंगलभागात जखमी अवस्थेत आढळला होता. मुख्तारचे राजस्थानच्या बंटी टोळीसोबत टोळीयुद्ध झाले होते. भीमसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारी करण्यावरून दोन टोळय़ांमध्ये वाद झाला. त्यानंतर त्यांच्यामध्ये गोळीबार झाला. टोळीयुद्धात मुख्तार टोळीचा एकजण ठार झाला होता. तसेच मुख्तारसह त्याचा ‘राईट हॅन्ड’ समजला जाणार विकी वाहिद हासुद्धा जखमी झाला होता, अशी माहिती डीएसपी गिरिधर सिंह यांनी दिली.