कार रेसिंगदरम्यान गोळीबार, सर्व मृत कार रेसर्स
वृत्तसंस्था / मेक्सिको सिटी
मेक्सिकोच्या बाजा कॅलिफोर्नियामध्ये ड्रग माफियांदरम्यान झालेल्या टोळीयुद्धात 11 जण मारले गेले आहेत. तर 7 जण जखमी झाले आहेत. गोळीबारात मृत्युमुखी पडलेले सर्वजण कार रेसर्स होते. हे सर्वजण एका ऑल टेरेन कार रेसिंग शोमध्ये भाग घेण्यासाठी पोहोचले होते.
रेसिंगदरम्यान एनसेनाडा शहराच्या सॅन विसेंट भागात हे कार रेसर्स गॅस स्टेशनवर थांबले होते, तेव्हा काही वाहनांमधून आलेल्या गुंडांनी गोळीबार सुरू केला होता. या हल्ल्यानंतर पोलीस, मरीन, फायर ब्रिगेड, मेक्सिकन रेड क्रॉसची पथकं घटनास्थळी पोहोचली होती.
ड्रग माफिया अन् तस्करीचे केंद्र
एनसेनाडामधील हा गोळीबार अरेलेनो फेलिक्स कार्टेल आणि सिनालोआ कार्टेल या ड्रग माफियांच्या टोळ्यांमधील वैमनस्यातून झाला आहे. बाजा कॅलिफोर्नियाला गुन्ह्यांचे केंद्र मानले जाते. अमेरिकेत अमली पदार्थ अन् मानवी तस्करी करण्याचे सर्व मार्ग येथूनच सुरू होतात. याचमुळे या भागावर कब्जा करण्यासाठी ड्रग माफियांदरम्यान अनेकदा टोळीयुद्ध होत असते.
राज्याच्या अॅटर्नी जनरलने गोळीबाराच्या चौकशीसाठी एक विशेष पथक स्थापन केल्याची माहिती महापौर अरमांडो अयाला रोबल्स यांनी दिली आहे. परंतु गोळीबारातील पीडितांची ओळख आणि राष्ट्रीयत्व अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मेक्सिकोच्या रेड क्रॉसने जखमींना उत्तर बाजा कॅलिफोर्नियाच्या रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. यातील काहींची प्रकृती गंभीर आहे.