चार ते पाच हल्लेखोरांचे कृत्य : तलवारीसह कोयत्याने शरीरावर 17 वार : सिपीआर रुग्णालयात तणाव
प्रतिनिधी/कोल्हापूर
राजेंद्रनगर येथील वर्चस्ववाद आणि गँगवारमधून सराईत गुंडाचा त्याच्याच साथीदारांनी पाठलाग करुन निर्घुण खून केला. कुमार शाहूराज गायकवाड (वय 24 रा. राजेंद्रनगर) असे त्याचे नांव आहे. रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास डी. वाय. पी मॉलच्या दारात ही घटना घडली. चार ते पाच हल्लेखोरांनी अर्धा किलोमीटर पाठलाग करुन तलवार कोयत्याने कुमारच्या शरीरावर सुमारे 17 वार केले. यामध्ये त्याच्या डोक्यास, पाठीत तसेच पोटात वर्मी घाव लागले आहेत. दरम्यान या प्रकरणी अमर, बाळु शिंदे, जोकर यांचा पोलीस शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुमार गायकवाड याच्या वडीलांचे 10 वर्षापूर्वी निधन झाले आहे. तो सध्या आई व मामा त्र्यंबक कांबळे या दोघांसोबत राजेंद्रनगर परिसरात राहत होता. रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तो मामा त्र्यंबक कांबळे व मित्रांसोबत दोन दुचाकींवरुन डी. वाय. पी मॉल परिसरात कामानिमीत्त आला होता. फोन आला म्हणून त्याचा मामा त्र्यंबक कांबळे हा दुचाकीवरच बोलत थांबला होता. याच दरम्यान अंधारामध्ये अमर, बाळू, जोकर व त्याचे साथीदार थांबले होते. त्यांनी कुमारला बाजूला घेवून त्याच्यासोबत वाद करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान त्याच्यावर वार करण्यास सुरुवात केली. कुमार जिवाच्या आकांताने दुचाकी तेथेच टाकून पळत सुटला. हल्लेखोरांनी कुमारचा पाठलाग करुन त्याच्यावर वार करण्यास सुरुवात केली.
ठरवून गेम
मारेकऱयांनी कुमारचा ठरवून गेम केल्याची चर्चा सिपीआर रुग्णालयात होती. गेल्या काही दिवसांपासून कुमार व अमर, बाळू व जोकर यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते. हे वाद नेहमीच धुमसत होते. यातूनच या तीघांना आपला गेम होण्याची भिती वाटत होती. यापूर्वीच रविवारी रात्री या तिघांसह त्यांच्या साथीदारांनी कुमारचा गेम केला.
वर्चस्वाद
कुमार, अमर, बाळू व जोकर हे पुर्वाश्रमीचे मीत्र आहेत. या चार जणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये खूनाच्या प्रयत्नासह विविध गुन्हे दाखल आहेत. मात्र कालांतराने या चौघांमध्ये खटके उडू लागले. तसेच राजेंद्रनगर परिसरात वर्चस्ववाद आणि तेथील गँगवार यातून या चौघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. कुमारच्या विरोधात अमर, बाळू व जोकर एकत्र होवून गँग तयार केली होती.
सिपीआर रुग्णालयात तणाव
दरम्यान कुमार गायकवाडचा खून झाल्याची बातमी वाऱयासारखी राजेंद्रनगर, कळंबा परिसरातील त्याचा मित्र परिवार सिपीआर रुग्णालयात दाखल झाला. तसेच त्याची आई व त्याचे नातेवाईक सिपीआर रुग्णालयात दाखल झाले. नातेवाईकांनी केलेला आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता. दरम्यान सिपीआर रुग्णालयात गर्दी झाल्याने रात्री उशिरा पर्यंत तणावाचे वातावरण होते. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, तसेच राजारामपुरी येथील पोलीस बंदोबस्त सिपीआर आवारात तैनात ठेवण्यात आला होता. दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजेश गवळी, ईश्वर ओमासे यांनी भेट दिली.
अर्धा किलोमीटर पाठलाग
मारेकऱयांनी कुमारचा सुमारे अर्धा किलोमीटर पाठलाग करुन त्याचा निर्घुण खून केला. कुमार टेंबलाईवाडी उड्डाणपुलावरुन जिवाच्या आकांताने ओरडत पळत सुटला होता. मारेकऱयांनी फिल्मी स्टाईलने त्याचा गेम केला. डिवायपी मॉलच्या दारातून पाठलाग करुन त्याला टाकाळा खण येथील मंदिरापर्यंत त्याच्यावर वार करण्यात आले.
दुचाकीवरुन पार्वती टॉकीज पर्यंत
कुमार गायकवाडवर वार झाल्यानंतर त्याच्या साथीदारांनी त्याला दुचाकीवरुन पार्वती टॉकीज पर्यंत आणले. तेथे सिपीआर कडे निघालेल्या एका ऍम्ब्युलन्स थांबवून त्याला सिपीआरमध्ये आणण्यात आले. मात्र तत्पूर्वीचा त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र हल्लेखोरांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला. यामुळे सिपीआर रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कुमार गायकवाड तडीपार
कुमार गायकवाडवर यापुर्वी राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खूनाचा प्रयत्न, दहशत माजविणे, टोळी , खंडणी अशा गंभीर गुह्यांचा समावेश आहे. त्याला राजारामपुरी पोलिसांनी सहा महिन्यापूर्वी शहरातून 1 वर्षासाठी तडीपार केले होते. मात्र तरीही त्याचा वावर शहरात होता.
राजेंद्रनगर परिसरात तणाव
दरम्यान या खूनाचा बदला घेणयाचा पवित्रा कुमारच्या समर्थकांनी व मित्र परिवाराने घेतला. यामुळे राजेंद्रनगर परिसरात तणावाचे वातावरण होते. रात्री उशिरा पर्यंत परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.