कंग्राळी खुर्द ग्रा. पं. ने कारवाई करण्याची गरज
अगसगे फाटय़ाजवळ कचऱयाचे साम्राज्य निर्माण झाल्याने ये-जा करणाऱया वाहन चालकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. अलीकडच्या काही दिवसात सातत्याने कचऱयात वाढ होत असल्याने कचरा डेपोचे स्वरुप निर्माण झाले आहे. तरी संबंधित कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीने स्वच्छता करून कचरा टाकणाऱयांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अगसगे-बेळगाव या मुख्य रस्त्यावरून सुमारे पंधरा गावचे ग्रामस्थ दररोज ये-जा करतात. या मार्गावरील अगसगे फाटय़ाजवळ मोठय़ा प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याने परिसराच्या सौंदर्यालादेखील बाधा निर्माण झाली आहे. वाहन चालकांना नाक बंद करून ये-जा करावी लागत आहे. रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने वाहतुकीलादेखील अडथळा निर्माण झाला आहे. याबाबत कित्येकवेळा तक्रार करूनदेखील संबंधित ग्रा. पं. ने काहीच कारवाई केली नाही. यामुळे वाहन चालकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
या रस्त्याच्या दुतर्फा हॉटेल, मद्यविक्रीची दुकाने आहेत. दरम्यान हॉटेल आणि इतर व्यावसायिकांकडून तसेच काही अज्ञात व्यक्ती येऊन या ठिकाणी शिल्लक राहिलेले अन्न व इतर कचरा रस्त्याशेजारीच टाकतात. याबरोबर प्लास्टिक कचरा देखील मोठय़ा प्रमाणात साठवला जात आहे. कचऱयावर ताव मारण्यासाठी भटकी कुत्री तुटून पडत आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून एक मोठे टोळके येथेच ठाण मांडून आहे.
कचरा टाकणाऱयांवर कारवाई करा
गेल्या दोन-तीन वर्षांपासून या ठिकाणी काही अज्ञात व्यक्ती आणि हॉटेल व्यावसायिक कचरा टाकत आहेत. कचऱयाची उचलच झाली नसल्यामुळे मोठय़ा प्रमाणात कचऱयाचा साठा निर्माण झाला आहे. नाशिवंत पदार्थ कुजून दुर्गंधी पसरत आहे. प्लास्टिक व इतर केरकचरा साठल्याने याठिकाणी कचऱयाचा डेपो निर्माण झाला आहे. तरी संबंधित ग्रा. पं. ने याकडे लक्ष देऊन कचरा टाकणाऱयांवर कायदेशीर कारवाई करावी आणि कचरा काढून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी वाहन चालकांतून होत आहे.