मंत्री सुदिन ढवळीकरांचा इशारा
वार्ताहर /मडकई
कवळे पंचायतीच्या कचरा वर्गीकरण शेडला आग लावणाऱया विघ्नसंतोषी लोकांची गय केली जाणार नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे कृत्य कैद झाल्याने त्यांची ओळख पटेल. जनतेच्या सोईसाठी असलेली ही शेड माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे येत्या आठ दिवसात पुन्हा उभारुन देण्याचे आश्वासन स्थानिक आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिले आहे.
मंत्री ढवळीकर यांनी नुकतीच घटनास्थळी भेट देऊन या शेडची पाहणी करुन नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी सरपंच राजेश कवळेकर, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, उपसरपंच मनुजा नाईक, पंचसदस्य मनोज बोरकर, उषा नाईक, द्रुपदा नाईक, श्वेता गावडे, समीता नाईक, पंचायत सचिव हरिश्चंद्र नाईक हे उपस्थित होते. गेली अनेक वर्षे कवळे पंचायत व माधवराव ढवळीकर ट्रस्ट घरोंघरचा कचरा गोळा करण्याचे काम करीत आहे. या शेडमध्ये ओल्या व सुक्या कचऱयाचे वर्गीकरण केल्यानंतर सालीगांव येथील प्रकल्पात पाठविला जातो. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांना जनतेचे भले झालेले पाहवत हेच या घटनेतून अधोरेखीत होते, असे मंत्री ढवळीकर म्हणाले.
अशाच प्रकारचा विरोध कपिलेश्वरी वेळीप व उंडीर येथे होऊ घातलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाला झाला. स्वच्छता व आरोग्याच्यादृष्टीने असे प्रकल्प होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आपण हा प्रकल्प आणला. मात्र काही अपप्रवृत्तीच्या लोकांना हा विकास खुपतो. फोंडा व कुर्टी काही घरातील सांडपाणी उघडय़ा गटारात व नाल्यात सोडले जात असल्याने कपिलेश्वरीचा हा नाला प्रदुषीत झाला आहे. वेळोवेळी या समस्येवर आवाज उठवूनही हे प्रकार बंद होत नसल्याने या लोकांचे वीज व पाण्याच्या जोडण्या कापाव्या लागतील, असा इशाराही मंत्री ढवळीकर यांनी दिला आहे.