परशुराम गोमंतक सेनेकडून आयोजन
प्रतिनिधी /पणजी
म्हादई नदीच्या पाणी प्रश्नावर जागृती करण्याच्या दृष्टीने शनिवार दि. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. पणजी येथील आझाद मैदानावर म्हादईच्या रक्षणासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. म्हादई चळवळ व लढ्याचा एक भाग म्हणून हा उपक्रम आखण्यात आला असून त्यात सामाजिक संस्था, कार्यकर्ते, पर्यावरणवादी अशा सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन परशुराम गोमंतक सेनेचे प्रमुख शैलेंद्र वेलिंगकर यांनी केले आहे. पणजीत काल मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील माहिती दिली.
अमित शहांचे विधान बेकायदेशीर
म्हादईचा विषय न्यायप्रविष्ट असताना कर्नाटकच्या डिपीआरला मान्यता देणे तसेच प्रचारसभेत म्हादईचे पाणी कर्नाटकसाठी दिले म्हणून अमित शहा यांनी सांगणे हे सर्व बेकायदेशीर आणि दुर्दैवी आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.
आपलेच दात, आपलेच ओठ
केंद्राने गोव्याचा हा मोठा विश्वासघात केला असून राजकीय स्वार्थासाठी म्हादईचा बळी देण्यात आला आहे. त्यावर गोवा सरकारची परिस्थिती आपलेच दात, आपलेच ओठ असे झाल्याची टिपणी त्यांनी पुढे बोलताना केली.
सर्व तालुक्यांत करणार जागृती
गोव्यातील सर्व 12 तालुक्यात म्हादईच्या या प्रश्नावर जनजागृती करण्यात येणार असून लोकांना म्हादईचे गोव्यासाठी असलेले महत्त्व पटवून देण्यात येणार असल्याचे वेलिंगकर म्हणाले. अॅड. शैलेश गावस यांनी गोवा व कर्नाटकातील नद्या, जिल्हे याबाबतची अभ्यासपूर्ण तपशील थोडक्यात सादर केला आणि म्हादईचे महत्त्व सांगितले. शेखर गावकर त्यावेळी उपस्थित होते.