16 प्रमुख खात्यांच्या सचिवांचा गट स्थापन : उद्योग सचिवांकडून अधिसूचना जारी
प्रतिनिधी /पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘गती शक्ती नॅशनल मास्टर प्लॅन’ च्या धर्तीवर गोवा राज्यासाठी आता मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार असून त्याकरिता 16 प्रमुख खात्यांच्या सचिवांचा मिळून एक गट स्थापन करण्यात आला आहे. मुख्य सचिव हे त्या गटाचे प्रुमख आहेत. हा गट सदर मास्टर प्लॅन तयार करणार असून त्याची कार्यवाही पुढे नेणार आहे. उद्योग सचिव अमालिया पिंटो यांनी या संदर्भात एक अधिसूचना जारी केली असून त्यात वरील माहिती देण्यात आली आहे.
प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी प्लान
राज्यातील अनेक विकास प्रकल्प विविध कारणांमुळे प्रलंबित राहतात आणि ते वेळवर पूर्ण होत नाहीत. परिणामी खर्च वाढतो. तसेच तो जनतेसाठी असेल तर त्याचे लाभ जनतेला वेळेवर मिळत नाहीत. हे सर्व टाळण्यासाठी तसेच विविध साधन सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत म्हणून हा मास्टर प्लॅन तयार करण्याचा इरादा आहे.
खात्यांमधील दूरी भरून काढण्याचे कार्य
सर्व प्रमुख खात्याच्या सचिवांना या गटात समाविष्ट करण्यात आले असून त्यांना खात्यांतर्गत समन्वय साधण्यासाठी तसेच गरजेनुसार बदल करण्यासाठी काही अधिकार देण्यात आले आहेत. त्याकरिता काही नियम अटी निश्चित करण्यात आल्या असून विविध खात्यातील दूरी भरून काढण्यासाठी हा गट कार्य करणार आहे. या सचिव गटाचे एकूण 16 सदस्य असून ठरावीक कालावधीनंतर हा गट बैठका घेऊन मास्टर प्लॅनचा आराखडा निश्चित करणार आहे आणि तो पुढे नेणार आहे.
सार्वजनिक बांधकाम खाते, वित्त, हवाई वाहतूक, वीज, नदी परिवहन, उद्योग, कृषी, खाण, मच्छीमारी, वाहतूक, नागरी विकास, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, बंदर आशा विविध खात्यांचे सचिव गटात आहेत. या मास्टर प्लॅनमध्ये विविध प्रकल्पांचा कालावधी निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.