प्रतिनिधी / माळशिरस
14 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत मलेशिया, क्वालंलपूर येथे होणाऱया मिस व मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल स्पर्धेत मिसेस गटाचे भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी गौरी अशोक तावरे-थोरात यांना मिळाली असून राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जीवनावरील एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून त्या संपूर्ण महाराष्ट्रभर परिचयाच्या आहेत. निमगावकरांची नात गौरी तावरे-थोरात या मिसेस हेरिटेज स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याने निमगावकरांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
सिंगापूर येथील कंपनीचे प्रायोजकत्व असलेल्या या स्पर्धेसाठी मृणाल गायकवाड या भारताच्या संचालक म्हणून काम पाहात आहेत गौरी तावरे-थोरात यांच्या दुर्गराज रायगड या विषयावरील मराठमोळ्या सादरीकरणाने त्यांना राष्ट्रीय विजेतेपद मिळाले असून त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेबांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाटय़ाचे आजवर 160 हून अधिक प्रयोग सादर केले आहेत.
महाराष्ट्रातील गड किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे, लेण्या यावर त्यांचा अभ्यास आहेच. परंतु तलवारबाजी, लाठीकाठी व घोडेस्वारी यामध्ये त्या अत्यंत तरबेज आहेत. अगदी लहानपणापासूनच त्यांच्या आई विजयश्री व वडील विश्वजित तावरे यांनी गौरी यांना सर्व किल्ले फिरून दाखविले आहेत. त्या महाराष्ट्र पोलीस दलात अप्पर अधीक्षक असणाऱया अशोक थोरात यांच्या पत्नी आहेत. गौरी तावरे-थोरात या मिसेस हेरिटेज स्पर्धेचे भारताचे प्रतिनिधित्व करीत असल्याने याही स्पर्धेत त्या विजयश्री खेचून आणतील अशा सर्वांकडूनच अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
स्पर्धा आणि गौरी यांची कामगिरी
जगभरातील जवळपास 30 हून अधिक देशांमधील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होत असून यात प्रामुख्याने रशिया, चीन, जपान, युपेन, पाकिस्तान, न्यूझीलंड यासारख्या अनेक देशांचा सहभाग असतो. मिस अँड मिसेस युनिव्हर्स प्रमाणेच ही स्पर्धा असून या स्पर्धेतील सादरीकरण मात्र वेगळे आहे. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सुयश संपादन करून गौरी तावरे-थोरात त्यांना आता भारतीय परंपरा सोबत घेऊन थेट आंतरराष्ट्रीय मंचावर सादरीकरण करण्याची संधी प्राप्त झाली आहे.