Tarun Bharat

गेहलोत अध्यक्षपदाच्या रिंगणात

राहुल गांधींच्या नकारानंतर निवडणूक लढविण्याची घोषणा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

राजस्थानचे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने सध्या केरळमध्ये असलेल्या राहुल गांधी यांच्या भेटीनंतर त्यांनी निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. मला राहुल गांधींना पुन्हा एकदा अध्यक्ष होण्याची विनंती करायची होती, पण त्यांनी नकार दिल्यामुळे आपण अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशोक गेहलोत यांच्याशिवाय शशी थरुर, मनीष तिवारी तसेच अन्य काही नेतेही अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, गेहलोत यांना सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

राहुल आणि सोनिया गांधी यांनी निवडणूक लढण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर आता गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला अध्यक्ष बनण्याचा मान मिळणार आहे. यावेळी केवळ बिगर गांधी अध्यक्ष होतील, हा अंतिम निर्णय आहे, गांधी कुटुंबातून अध्यक्ष होणार नाही, असे राहुल गांधींनीही म्हटले आहे. अध्यक्षपद निवडणुकीसाठी अधिसूचना जारी झाली असून अशोक गेहलोत 28 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. नामांकनाच्या दिवशी काँग्रेस आमदारांनाही दिल्लीला बोलावून घेण्याच्यादृष्टीने गेहलोत यांनी मोर्चेबांधणी चालवली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अध्यक्षपदाच्या दावेदारीवरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत. मात्र, हळूहळू चित्र स्पष्ट होत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी स्वतः या निर्णयाची घोषणा केली आहे. आता गेहलोत यांच्याविरोधात कोण-कोण शर्यतीत उतरतात हे येत्या आठवडय़ात स्पष्ट होईल. सद्यस्थितीत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी गेहलोत यांनाच पाठिंबा दर्शवत आपण उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अशोक गेहलोत हे आतापर्यंत राहुल गांधींचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे उत्तर देत होते. अखेरपर्यंत त्यांनी राहुल गांधींचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहुल गांधी यांनी निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर गेहलोत यांनी आपण काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

मुख्यमंत्रिपद सोडणार

निवडणूक लढवण्याच्या घोषणेसोबतच अशोक गेहलोत यांनीही आपण राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘एक व्यक्ती, एक पद’ यानुसार मी राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सोडणार असल्याचे गेहलोत यांनी स्पष्ट केले आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यास पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबतचा निर्णय सोनिया गांधी आणि प्रदेश प्रभारी ठरवतील असेही ते म्हणाले. 

राजस्थानात राजकीय वातावरणात बदल

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अशोक गेहलोत यांची उमेदवारी निश्चित झाल्यापासून सचिन पायलट यांचे समर्थक सक्रिय झाले आहेत. सचिन पायलट यांचा हॅशटॅग ट्विटरवर टेंड होत आहे. पायलट समर्थक सोशल मीडियावर भरपूर कमेंट करत आहेत. त्याचवेळी पायलट समर्थक आमदारांनी हितचिंतकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

सचिन पायलट यांचे जोरदार लॉबिंग

राहुल गांधींनी अध्यक्ष होण्यास नकार दिल्याने आणि अशोक गेहलोत यांनी उमेदवारी दाखल करण्याच्या घोषणेदरम्यान काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी राजस्थानमधील आमदारांशी चर्चा सुरू केली आहे. पायलट यांची नजर राजस्थानमध्ये रिक्त होणाऱया मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसच्या सर्व गटातील आमदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. एकेकाळी त्यांचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱया आमदारांचा यात समावेश आहे. राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर सचिन पायलट सक्रिय होणे आणि आमदारांशी बोलणे याकडे नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत मानले जात आहेत. सचिन पायलट यांच्याशिवाय माजी केंद्रीय मंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांचेही नाव मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांमध्ये आहे.

दिग्विजय यांनी केले गेहलोत यांचे कौतुक

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी आपण हायकमांडच्या आदेशानुसार काम करणार असल्याचे सांगितले. पण काही गोष्टी त्यांच्याशीही मी तडजोड करत नाही, असेही ते पुढे म्हणाले. तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे कौतुक करताना राष्ट्रीय अध्यक्षामध्ये जे गुण असावेत ते सर्व त्यांच्यात असल्याचे स्पष्ट केले. ते शुक्रवारी एका कार्यक्रमानिमित्त जबलपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

अर्ज दाखल करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली आहे. त्यानंतर 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला अध्यक्षपदाचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

Related Stories

तिरुपती बालाजीला सोन्याची तलवार अर्पण

Patil_p

‘स्पुतनिक-व्ही’ लसीचे ऑगस्टपासून भारतात उत्पादन?

datta jadhav

59 हजार कोटींच्या स्कॉलरशिप योजनेला मंजुरी

Omkar B

ड्रोनद्वारे औषधांची डिलिव्हरी करणारे ‘हे’ ठरणार पहिले राज्य

datta jadhav

पश्चिम बंगालमध्ये भाजप आमदाराचा मृतदेह सापडला लटकलेल्या अवस्थेत; पार्टीने केला हत्येचा आरोप

Tousif Mujawar

पंतप्रधान मोदी करणार अमेरिकेचा दौरा

datta jadhav
error: Content is protected !!