हिशोबात घोळ असल्याचा महाजनांचा आरोप : अस्थायी समिती स्थापण्याचा निर्णय,कित्येक वर्षे ऑडिट नाही,लिहिलेल्या इतिवृत्तानुसार कामकाज झाले नाही
प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री देव बोडगेश्वर संस्थानची आमसभा पुन्हा एकदा वादळी ठरली. काही महाजनांनी हिशोब व इतिवृत्तात त्रुटी असून ही आमसभाच बेकायदेशीर असल्याचे सांगून आक्रमक प्रवित्रा घेतला. त्यामुळे देवस्थान अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी 10 जणांची अस्थायी समिती स्थापून चतुर्थीनंतर ऑक्टोबरमध्ये पुन्हा बैठक घेतली जाईल अशी माहिती देत आमसभा तहकूब केली.
देवस्थान अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी सांगितले की, सभेत इतिवृत्त वाचनावेळी महाजनांनी इतिवृत्ताच्या प्रती मागितल्या. इतिवृत्ताच्या प्रती महाजनांना देण्याची प्रथाच नाही. पूर्वीच्या कमिटीनी ज्या प्रभा सुरु केल्या त्याच आम्ही चालवत आहोत. काही महाजनांनी इतिवृत्त बरोबर नसल्याचा आरोप केला व त्यांनी अस्थायी समिती स्थापण्याचा निर्णय महाजनांनी घेतला असता त्याला आपण मान्यता दिली आहे. चतुर्थी झाल्यानंतर ऑक्टोबरपर्यंत पुन्हा बैठक घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
पैसे कुणी खाल्ले त्यांना देव पाहणार : आनंद भाईडकर
2018 ते 2022 दरम्यानचे अंदाजपत्रक बाकी राहिले आहेत. कोविडमुळे सरकारने केवळ 200 महाजनांची परवानगी आमसभेला दिली होती मात्र आमचे दोन हजार महाजन आहेत. ऍड. महेश राणे यापूर्वी कधीच सभेला आले नाही आता 12 वर्षानंतर त्यांना जाग आली आहे. ऍड. सुभाष नार्वेकर यांनीही कायद्याचे पालन केले नाही. त्यांनी जी प्रक्रिया सुरु केली तीच आम्ही पुढे नेली आहे. ज्यांनी पैसे खाल्ले त्यांना देव बोडगेश्वरच शिक्षा करेल, आपल्यावर नाहक आरोप नको, असे ते म्हणाले.
दस्तावेज नीट तयार करुन सभा घ्या : ऍड. महेश राणे
श्री देव बोडगेश्वर देवस्थान समिती महाजनांना विश्वासात न घेता कारभार करत आहे. सध्या चाललेला कारभार बेकायदेशीर आहे. 2019 ते आजपर्यंतचे इतिवृत्त नोंदवहीत लिहिलेले नाही, फक्त महाजनांच्या सह्या आहेत. यापुढेही बेकायदेशीर कृत्य करण्याचा त्यांचा इरादा होता तो आम्ही हाणून पाडला, असे ऍड. राणे यांनी सांगितले. 2019 ते 22 च्या अंदाजपत्रकाला मान्यता नाही, ऑडिट नाही, सचिवाची सही नाही, खजिनदाराच्या सहीत फेरफार झाल्याचे दिसून येते, पासबूक ऑडिटरसमोर सादर केले नाही या मुद्यावरुनच ही आमसभा वादळी झाली व अध्यक्ष आनंद भाईडकर यांना सभा तहकूब करावी लागली, असे ऍड. महेश राणे यांनी सांगितले.
ऑडिट करणारा आपण पहिला अध्यक्ष : ऍड. महेश राणे
2001 ते 2003 सालात आपण देवस्थान समितीचा अध्यक्ष होतो. ऑडिटरकडून हिशोब तपासून घेणारा आपण पहिला अध्यक्ष आहे. तीन वर्षांसाठी आपल्याला अध्यक्षपद मिळाले यात आपण खूश होतो म्हणून पुढे आपण अध्यक्षपद घेतले नाही. आताच्या अध्यक्षांनी हिशोबात घोळ घातला आहे. हा घोळ कितीचा आहे हे सांगू शकत नाही कारण हिशोबच सादर झाला तो बेकायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या सुरु असलेला व्यवहार बेकायदेशीर : नंदू शिरगांवकर
देवस्थानकडे सध्या 34 लाख रु. बॅलन्स असल्याचे माजी उपमुख्यत्यार नंदू शिरगांवकर यांनी सांगितले. पहिल्या बैठकीच्यावेळी 1980 रुपये शिल्लक होते. सुभाष नार्वेकर अध्यक्ष असताना 11 लाख रुपयांची एफडी केली होती. त्यानंतर आतापर्यंत कुणीही एफडी केली नाही. आपण त्यांना अनेकदा सल्ले दिले मात्र त्यांना सर्व व्यवहार बेकायदेशीरित्याच करायचे होते. इतिवृत्तात लिहिलेल्या कामांची त्यांनी मान्यता कधी घेतलीच नाही. 10 लाख खर्च झाला असेल तर तेथे 20 लाख दाखविला आहे. देवस्थान समितीचा सर्व व्यवहार कायदेशीर करुन आमच्यासमोर ठेवा, अशी मागणी त्यांनी केली.
बेकायदेशीर सभा रद्द करण्याची महाजनांची मागणी
दहा जणांची अस्थायी स्थापन करुन त्यात माजी अध्यक्ष व सदस्यांचा समावेश करावा अशी मागणी विनोद फडके, ऍड. सुभाष नार्वेकर यांनी केली. प्रवीण आसोलकर व संजय बर्डे यांनी म्हापसा बाहेरील लोकांना महाजनपदी भरले व काहींना जाणून बुजून डावलण्यात आल्याचा आरोप केला. बर्डे यांनी देवस्थान समितीने व्यवहारात मोठा घोळ केला आहे, आजची बैठक बेकायदेशीर असून ती रद्द करावी अशी मागणी केली. यावेळी भारत तोरस्कर, एकनाथ म्हापसेकर आदींनी आपले विचार मांडले. दोन वेळा महाजन सभा तहकूब होणे ही लज्जास्पद गोष्ट असून यातून महाजनांचा समितीवरचा अविश्वास स्पष्ट दिसून येतो. मामलेदारांनी चौकशी करुन समिती बरखास्त करावी व नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यासाठी निवडणूक घेण्याचा आदेश द्यावा, असे महाजन सुदेश तिवरेकर म्हणाले.
फंडपेटीतील पैसे बँकेत भरले नाही महाजन शशिकांत कांदोळकर म्हणाले की, येथे नवीन अध्यक्ष 500 महाजन आणून आपली खूर्ची घट्ट करतो. आज सुमारे 2600 महाजन असून त्यांना विश्वासात घेतले जात नाही. या समितीत ताळमेळ नाही. फंडपेटी, देणगी आदी पैसे मोजले जातात मात्र ते बँकेत भरले जात नाही. दोन शेतकऱयांच्या जमिनीवर न सांगताच बांधकाम केल्याचा आरोप त्यांनी केला.