230 हून अधिक जणांची हत्या ः ओरोमो लिबरेशन आर्मीवर संशय
वृत्तसंस्था/ ओरोमियो
इथियोपिया या आफ्रिकन देशात नरसंहाराची हादरवून टाकणारी घटना घडली आहे. तेथील ओरोमिया भागात रविवारी रात्री अमहारा समुदायाच्या सुमारे 250 जणांची हत्या करण्यात आली आहे. हा हल्ला ओरोमिया गावात झाला आहे. बंडखोर गट ओरोमो लिबरेशन आर्मीने (ओएलए) हा क्रूर प्रकार केल्याचा संशय आहे. इथियोपियात मागील काही वर्षांमध्ये समुदायांमधील तणाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे.
हल्ल्यातून बचावलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी या हल्ल्यांसाठी ओरोमो लिबरेशन आर्मीला जबाबदार ठरविले आहे. ओरोमिया प्रांतीय सरकारने देखील ओएलएला जबाबदार मानले. ओएलएने सुरक्षा दलांकडून सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला विरोध करण्यासाठी हा हल्ला केल्याचे सरकारने म्हटले आहे. परंतु ओएलएचे प्रवक्ते ओदा तरीबी यांनी हे आरोप नाकारले आहेत. या नरसंहारासाठी सैन्य आणि स्थानिक सशस्त्र समूह जबाबदार आहेत, आमचे सदस्य कधीच हल्ला झालेल्या भागात गेले नसल्याचा दावा तरीबी यांनी केला आहे.
ही आमच्या जीवनातील सर्वात दुःखद घटना असून यात शेकडो लोकांना निर्घृणपणे ठार करण्यात आले आहे. आम्ही सध्या हे मृतदेह सामूहिक कब्रमध्ये दफन करत आहोत असे स्थानिक रहिवासी आणि प्रत्यक्षदर्शी अब्दुल सईद ताहिर यांनी सांगितले आहे.
अमहारा समुदायाच्या लोकांना 30 वर्षांपूर्वी तेथे वसविण्यात आले हेत. सामूहिक हत्यासत्रानुसार भीतीपोटी अमहारा समुदायाचे लोक आता स्वतःसाठी दुसरे ठिकाण शोधत आहेत. आदिवासी असलेल्या अमहारा समुदायाच्या लोकांना पुनर्वसन कार्यक्रमांच्या अंतर्गत सुमारे 30 वर्षांपूर्वी येथे वसविण्यात आले होते.
इथियोपियामधील अनेक क्षेत्रांमध्ये तीव्र जातीय तणावाची स्थिती आहे. समुदायांमधील तणावाचे कारण ऐतिहासिक आणि राजकीय आहे. इथियोपियाच्या सुमारे 11 कोटीच्या लोकसंख्येदरम्यान दुसरा सर्वात मोठा समुदाय हा अमहारा असून त्यालाच लक्ष्य करण्यात येत आहे.