इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरणार ः जगभरातील नेत्यांकडून अभिनंदन
वृत्तसंस्था / रोम
जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान होणार हे आता निश्चित झाले आहे. देशात झालेल्या निवडणुकीत जॉर्जिया यांच्या नेतृत्वाखालील उजव्या विचारसरणीच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. दुसऱया महायुद्धानंतर इटलीला पहिल्यांदाच उजव्या विचारसरणीच्या पक्षाचा पंतप्रधान मिळणार आहे. जॉर्जिया यांच्या पक्षाला 2018 च्या निवडणुकीत केवळ 4.5 टक्के मते मिळाली होती. जॉर्जिया यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वीच जगभरातील नेत्यांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
फ्रान्समधील उजव्या विचारसरणीच्या रॅली पार्टीच्या नेत्या मरीन ले पेन यांनी ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. इटलीच्या लोकांनी एक देशभक्त आणि सार्वभौम सरकार निवडण्याचा निर्णय घेतला आहे. जॉर्जिया मेलोनी आणि माटेओ साल्विनी यांनी हे आव्हान जिंकून एक लोकशाहीवादी नसलेल्या आणि अहंकारी युरापीय महासंघाच्या धोक्यांना विरोध केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन असे मरीन ले पेन यांनी नमूद पेले आहे.
हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बन यांचे राजकीय सल्लागार बालाज्स ओर्बन यांनीही जॉर्जिया यांचे अभिनंदन केले आहे. युरोपच्या आव्हानांबद्दल समान दृष्टीकोन अणि विचार असणाऱया मित्रांची आता खूपच अधिक आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्पेनचे नेते सँटियागो अबस्कल यांनी जॉर्जिया मेलोनींनी लोकांची सुरक्षा आणि समृद्धीसाठी तसेच एक सार्वभौम राष्ट्राच्या गर्वासाठी युरोपमुक्तचा मार्ग दाखविला असल्याचे नमुद केले आहे. पोलंडचे पंतप्रधान माटुस्ज मोराविएकी यांनीही जॉर्जिया यांचे अभिनंदन केले आहे.
जॉर्जिया मेलोनी कोण?
मेलोनी या इटलीतील उजव्या विचारसरणीच्या युरोपियन कॉन्झर्व्हेटिव्ह अँड रिफॉर्मिस्ट पार्टीचे नेतृत्व करतात, याला फार राइट ब्रदर्स पार्टी देखील म्हटले जाते. एका मुलाची आई अन् रोममध्ये राहणाऱया 45 वर्षीय मेलोनी यांनी ईश्वर, देश आणि कुटुंबाच्या नाऱयासोबत प्रचार केला होता. युरोपच्या युरोस्केप्टिसिजम (अपरिवर्तनीय स्थिती), स्थलांतरितविरोधी धोरणे, एलजीबीटीक्यू तसेच गर्भपाताच्या अधिकारांना कमजोर करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. मेलोनी यांच्या आघाडीत माजी उपपंतप्रधान माटेओ साल्विनी आणि फोर्जा इटॅलिया पार्टी सामील आहे. जॉर्जिया यांच्या पक्षाला 25.7 टक्के मते मिळाल्याचे समजते.
आम्ही सत्तेवर आल्यावर प्रत्येकासाठी काम करणार आहोत. आम्ही सर्व इटालियन नागरिकांसाठी काम करू. या देशातील लोकांना एकजूट करण्याचे लक्ष्य ठेवून आम्ही काम करणार आहोत असे जॉर्जिया यांनी स्वतःच्या पक्षाच्या रोम येथील मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले आहे. इटलीने आमची निवड केली असून आम्ही आमच्या देशाला फसविणार नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
इटलीतील पक्षीय बलाबल (निवडणुकीचा कल)
ब्रदर्स ऑफ इटली 118
द लीग 65
फोर्जा इटॅलिया 45
उजव्या विचारसरणीची आघाडी 235
प्लस युरोप 2
मध्यमार्गी डावे 12
मध्यमार्गी डावी आघाडी 79
फाइव्ह स्टार मूव्हमेंट 51
अझियोन 21 इतर 14