वृत्तसंस्था/ लिपझिग
शनिवारी येथे झालेल्या अंतिम सामन्यात जर्मनीच्या चॅम्पियन्स बायर्न म्युनिच संघाने आर. बी. लिपझिग क्लबचा 5-3 अशा गोलफरकाने पराभव करून जर्मन सुपर चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.
या अंतिम सामन्यात बायर्न म्युनिच फुटबॉल क्लबने अलीकडेच करारबद्ध केलेल्या सॅडीओ मॅनेने पूर्वार्धात आक्रमक शानदार खेळाचे प्रदर्शन घडविले. बायर्न म्युनिच संघ जर्मन फुटबॉल क्षेत्रामधील अव्वल म्हणून ओळखला जातो. आता हा संघ सलग अकराव्यांदा बुंदेसलिगा फुटबॉल स्पर्धा जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.
या अंतिम सामन्यात 14 व्या मिनिटाला बायर्न म्युनिचचे खाते जमाल मुसिलाने उघडले. 31 व्या मिनिटाला मॅनेने बायर्न म्युनिचचा दुसरा गोल केला. मध्यंतरापर्यंत बायर्न म्युनिचने 2-0 अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात लिपझिग संघाने आक्रमक खेळावर अधिक भर दिला. 56 व्या मिनिटाला त्यांचे खाते बदली खेळाडू आंद्रे सिल्वाने हेडरद्वारे नोंदविले. 59 व्या मिनिटाला बायर्न म्युनिचचा तिसरा गोल नोंदविला गेला. सर्जि गेनब्रायने हा गोल केला. 77 व्या मिनिटाला पेनल्टीवर क्रिस्टोफर नेकुंकुने बायर्न म्युनिचचा चौथा गोल केला. लिपझिगचा तिसरा गोल डॅनी ओल्मोने केला. सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना बदली खेळाडू लेरॉय सॅनेने बायर्न म्युनिचचा पाचवा गोल करून लिपझिगचे आव्हान संपुष्टात आणले. 2022 च्या फुटबॉल हंगामातील बायर्न म्युनिचचे हे पहिले विजेतेपद आहे. बुंदेसलिगा फुटबॉल हंगामाला 5 ऑगस्टपासून प्रारंभ होईल.