महिला गटातील युरो चषक फुटबॉल स्पर्धा ः 4-0 फरकाने एकतर्फी बाजी
वृत्तसंस्था/ ब्रेंटफोर्ड (इंग्लंड)
2022 युरो चषक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेतील येथे शुक्रवारी झालेल्या ब गटातील दुसऱया सामन्यात जर्मनीने डेन्मार्कचा 4-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या सामन्यात डेन्मार्कच्या खेळाडूंनी पूर्ण निराशा केली.
या सामन्यात 21 व्या मिनिटाला जर्मनीचे खाते लिना मॅग्युएलने उघडले. मध्यंतरापर्यंत जर्मनीने डेन्मार्कवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धात जर्मनीने आणखी 3 गोल नोंदविले. 57 व्या मिनिटाला ली स्कुलेरने जर्मनीचा दुसरा गोल हेडरद्वारे नोंदविला. 78 व्या मिनिटाला बदली खेळाडू लॅटविनने जर्मनीचा तिसरा गोल केला. सामना संपण्यास चार मिनिटे बाकी असताना जर्मनीचा चौथा आणि शेवटचा गोल बदली खेळाडू पॉपने नोंदवित डेन्मार्कचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. जर्मनीचा महिला फुटबॉल संघ या स्पर्धेत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून ओळखला जातो. त्यांनी आतापर्यंत नऊवेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
यापूर्वी झालेल्या युरो चषक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेत डेन्मार्कने जर्मनीचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला होता. त्या पराभवाचा जर्मनीने येथे परतफेड केली. आता या विजयामुळे जर्मनीने ब गटात गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले असून स्पेन दुसऱया स्थानावर आहे. पुढील मंगळवारी जर्मनी आणि स्पेन यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात डेन्मार्कने गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या. जर्मनीच्या बचाव फळीचे आणि गोलरक्षकाची कामगिरी भक्कम झाल्याने डेन्मार्कच्या चढाया थोपवल्या गेल्या.