नगरसेवकांचे प्रादेशिक आयुक्तांना निवेदन : प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेकांचे अर्ज
बेळगाव : महापौर-उपमहापौर निवडणूक दि. 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे. उपमहापौर पदासाठी ओबीसी ‘ब’ महिला आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे या पदासाठी निवडणूक लढविण्याकरिता अनेकजण इच्छूक आहेत. त्याकरिता ओबीसी ‘ब’ प्रमाणपत्राकरिता अर्ज करण्यात येत आहेत. पण हे प्रमाणपत्र देताना आयकर विभागाकडून ना हरकत दाखला घेण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन नगरसेविका वैशाली भातकांडे व अपक्ष नगरसेवकांनी प्रादेशिक आयुक्तांना दिले आहे. महापौर पद सामान्य महिलेसाठी आणि उपमहापौर पदाचे आरक्षण ओबीसी ‘ब’ महिलेकरिता जाहीर झाले आहे. ओबीसी ‘ब’ आरक्षण असलेल्या उमेदवारांना निवडणूक लढविता येते, असे प्रशासनाने जाहीर केले आहे. ओबीसी ब प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेकजणांनी अर्ज केले आहेत. पण आयकर खात्याकडून एनओसी घेतल्यानंतरच ओबीसी ‘ब’ प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बोगस कागदपत्रे जोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होऊ शकते. तसेच न्यायालयीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने सदर प्रमाणपत्र देताना काळजीपूर्वक कागदपत्रांची चाचपणी करावी, न्यायालयीन वाद टाळण्यासाठी आयकर विभागाकडून ना हरकत दाखला घेण्यात यावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तहसीलदारांकडून सदर प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे सदर निवेदन यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आले आहे. तसेच महापौर-उपमहापौर निवडणुकीवेळी निवडणूक अधिकारी म्हणून प्रादेशिक आयुक्त काम पाहतात. त्यामुळे प्रादेशिक आयुक्तांना सदर निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी निवेदन देताना नगरसेविका वैशाली भातकांडे, अफरोज मुल्ला, लक्ष्मी लोकरी, रियाज किल्लेदार, नगरसेवक रवि साळुंके, शिवाजी मन्नोळकर, बाबाजान मतवाले आदी उपस्थित होते.