अमेरिकेची स्वतःच्या नागरिकांना सूचना ः रशियाकडून प्रत्युत्तरादाखल गंभीर आरोप
वृत्तसंस्था / मॉस्को
अमेरिकेने स्वतःच्या नागरिकांना त्वरित रशियातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. युक्रेन युद्ध आणि रशियाच्या कायदा-अंमलबजावणी यंत्रणांकडून होणारी मनमानी कारवाई तसेच छळ होण्याची भीती हे यामागील कारण असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेचे सैन्य रशिया आणि पूर्वाश्रमीच्या सोव्हियत महासंघात हल्ला करण्यासाठी इस्लामिक दहशतवाद्यांना बळ पुरवत असल्याचा आरोप रशियाच्या गुप्तचर यंत्रणेने सोमवारी केला आहे.
रशियात राहणारे किंवा प्रवास करणाऱया अमेरिकेच्या नागरिकांनी त्वरित येथून बाहेर पडावे. चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्या जाण्याच्या जोखिमीपासून वाचण्यासाठी सावधगिरी बाळगा, रशियाचा प्रवास करू नका असे मॉस्कोमधील अमेरिकेच्या दूतावासाने नमूद केले आहे.
अमेरिकेने वारंवार स्वतःच्या नागरिकांना रशियातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. अशाप्रकारचा अखेरचा इशारा सप्टेंबर महिन्यात देण्यात आला होता. तेव्हा रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी सैनिकांची जमवाजमव करण्याचा आदेश दिला होता.
रशियाच्या सुरक्षा यंत्रणांनी खोटे आरोप करत अमेरिकेच्या नागरिकांना अटक केली आहे. रशियाकडून अमेरिकेच्या नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. तसेच त्यांना निष्पक्ष आणि पारदर्शक कायदा-सुव्यवस्थेपासून वंचित ठेवले जात आहे. गोपनीय सुनावणी आणि विश्वासार्ह पुरावे सादर न करताच त्यांना दोषी ठरविले जात असल्याचे अमेरिकेच्या दूतावासाने म्हटले आहे. रशियाच्या अधिकाऱयांनी मनमानी पद्धतीने अमेरिकेच्या धार्मिक कार्यकर्त्यांच्या विरोधात स्थानिक कायदे लागू केले आहेत. तसेच धार्मिक कार्यांमध्ये भाग घेणाऱया अमेरिकेच्या नागरिकांच्या विरोधात गुन्हेगारी तपास हाती घेतल्याचा दावा दूतावासाने केला आहे.
दहशतवाद्यांचा वापर
अमेरिका रशियावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना बळ पुरवत आहे. इस्लामिक स्टेट आणि अल-कायदाशी निगडित समुहांच्या 60 दहशतवाद्यांची भरती करण्यात आली आहे. सीरियातील अमेरिकेच्या एका तळावर त्यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचा आरोप रशियाच्या विदेश गुप्तचर सेवेने (एसव्हीआर) केला आहे.