Tarun Bharat

लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज व्हा !

भाजप अध्यक्षांच्या कार्यकर्त्यांना आदेश, व्यापक जनतासंपर्काची सूचना 

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

केंद्रात सत्तेत असणाऱया भारतीय जनता पक्षाला आता 2024 मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असून, देशभरातील सर्व कार्यकर्त्यांना या निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी व्यापक जनसंपर्काच्या माध्यमातून केंद्र सरकारची जनताभिमुख धोरणे मतदारांपर्यंत पोहचवावीत, अशी सूचना राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी केली आहे.

भाजपच्या सर्व राज्यशाखांनाही सज्जतेचा आदेश देण्यात आला आहे. सर्वदूर जनतासंपर्क, समाजातील मान्यवरांशी संवाद, कार्यकर्त्यांचे जाळे भक्कम करणे, कार्यविभागणी, मतदानकेंद्रनिहाय कार्यकर्त्यांची निवड, ‘पन्नाप्रमुखां’ची निवड, तसेच राज्य शाखांना केंद्रीय नेत्वृत्वाने सोपविलेल्या कामांची त्वरेने पूर्तता करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. भाजपच्या पदाधिकाऱयांची दोन दिवसांची बैठक येथे आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी पक्षाने सर्व राज्य शाखांना संदेश पाठवून सज्ज्ता ठेवण्याचा आदेश दिला.

उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बैठकीचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले होते. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला देशभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला. लोकसभा निवणुकीप्रमाणेच, या निवडणुकीच्या आधी होणार असलेल्या राज्य विधानसभांच्या निवडणुकांच्या सज्जतेचाही आढावा घेण्यात आला. लोकसभा निवडणूक एप्रिल आणि मे 2024 मध्ये होणार असून या निवडणुकीच्या आधी कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड इत्यादी महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. तसेच काही छोटय़ा राज्यांमध्येही निवडणूक होणार आहे. जम्मू-काश्मीरची विधानसभा निवडणूक केव्हा होणार यासंबंधीही उत्सुकता आहे.

144 मतदारसंघांवर विशेष लक्ष

देशात 144 लोकसभा मतदारसंघ असे आहेत, जे भारतीय जनता पक्षाने आजवर कधीही जिंकलेले नाहीत. या मतदारसंघांवर आगामी लोकसभा निवडणुकीत विशेष लक्ष देण्यात येणार आहे. या मतदारसंघांमध्ये व्यापक आणि सखोल जनसंपर्काची अत्याधिक आवश्यकता आहे. कार्यकत्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी त्यासाठी सज्ज रहावे. आगामी लोकसभा निवडणुकीत या जागांपैकी शक्य तितक्या जागा जिंकण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच ज्या लोकसभा मतदारसंघांमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा 5000 किंवा त्यापेक्षा कमी मतांनी पराभव झाला आहे, तेथेही यावेळी अधिक जोर लावून त्या जागा जिंकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्या जागांवर पक्षाचे उमेदवार कमी मतांनी विजयी झाले आहेत, त्या मतदारसंघांमधील मताधिक्क्य वाढविण्यासाठी योजना सज्ज केल्या जात आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

त्रुटी दूर करणार

पक्षाच्या प्रचारकार्यातील त्रुती किंवा विसंवाद दूर करण्याचा आतापासूनच प्रयत्न केला जाणार आहे. पुढील निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज ठेवण्यासाठी दीड वर्ष आधीपासून कार्यक्रमांची योजना सज्ज ठेवण्यात आल्याचेही दिसून येत आहे.

Related Stories

दिल्लीतील कोरोना : 1,491 नवे रुग्ण; संसर्ग दराचे प्रमाण 1.93 टक्क्यांवर

Tousif Mujawar

सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका

Patil_p

भाजपचे पहिल्यांदाच राज्यसभेत शतक

datta jadhav

उत्तर प्रदेश : ट्रक अपघातात 24 मजूर ठार, 15 जण गंभीर जखमी

Tousif Mujawar

धनलक्ष्मीने मागे टाकले हिमाला

Patil_p

राज्यांनी इंधन करकपात करावी!

Patil_p