भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निर्देश ः कमकुवत क्षेत्रात अधिक जोर लावण्याची पंतप्रधानांची सूचना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चालू वर्षात होणाऱया नऊ राज्यांमधील विधानसभा आणि 2024 मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने सोमवारी दिल्लीतील एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पक्ष कार्यकारिणीची बैठक सुरू झाली. ही बैठक मंगळवारीही सुरू राहणार आहे. या बैठकीत पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापुढील सर्व निवडणुका मोठय़ा मताधिक्याने जिंकण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन उपस्थितांना केले. या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटेल चौक ते संसद मार्गावरील एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरपर्यंत 15 मिनिटांचा रोड शो केला.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी कार्यकर्त्यांना 2023 साठी पूर्णपणे तयार राहण्यास सांगितले. 2023 आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असून आतापासूनच निवडणुकीची तयारी करा. यंदा विधानसभा निवडणूक होणाऱया सर्व राज्यांमध्ये आम्हाला विजय नोंदवायचा आहे, असे सांगत भाजपाध्यक्षांनी सोमवारी सर्व कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. यासोबतच 2024 मधील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे सरकार असलेली राज्ये टिकवण्याबरोबरच सरकार नसलेल्या ठिकाणी पक्ष मजबूत झाला पाहिजे. मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या मतदारसंघांमध्येही आम्हाला जिंकायचे आहे, असे ते म्हणाले. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या पहिल्याच दिवशी नड्डा यांनी महत्त्वाचे निर्देश दिले.
‘गरीब कल्याण, हमारा संकल्प’
बैठकीत एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये लावण्यात आलेल्या सर्वात मोठय़ा बॅनरवर ‘गरीब कल्याण, हमारा संकल्प’ असे लिहिले होते. गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांना सरकारचे प्राधान्य राहणार असल्याचे या माध्यमातून सांगण्यात आले. कन्व्हेन्शन सेंटरच्या उजव्या आणि डाव्या बाजूला केंद्र सरकारच्या कामाचे चित्रण करण्यात आले आहे. यामध्ये उजवीकडे अयोध्या, काशी, सरदार पटेल यांचा पुतळा आणि प्रगती मैदानावरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा, तर डावीकडे संरक्षण क्षेत्रातील एकात्मतेची प्रतिमा आहे. रेल्वे आणि शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये वेगाने वाटचाल करणाऱया देशाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पक्षाचे दिग्गज सहभागी
राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हिमंता बिस्वा सरमा, मनोहरलाल खट्टर, भूपेंद्र पटेल आणि शिवराजसिंह चौहान यांच्यासह 350 नेते उपस्थित होते. कार्यकारिणी बैठकीपूर्वी सकाळच्या सत्रात पक्ष मुख्यालयात गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि नड्डा यांच्यासह सर्व सरचिटणीस, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत विचारमंथन बैठक पार पडली.
जे. पी. नड्डा यांना अध्यक्षपदी मुदतवाढ शक्मय
कार्यकारिणीची बैठक मंगळवारीही सुरू राहणार आहे. यादरम्यान, विद्यमान पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांचा कार्यकाळ संपत येत असताना आता आगामी लोकसभा निवडणुकीला जेमतेम एक वर्ष शिल्लक असल्यामुळे नड्डा यांना 2024 पर्यंत मुदतवाढ दिली जाण्याची दाट शक्मयता आहे. या वर्षात होणाऱया 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करण्याचा धोका पत्करला जाणार नसल्याचे दिसत आहे.
कर्नाटकसह तीन राज्यांचे अहवाल सादर
पहिल्या दिवसाच्या बैठकीत कर्नाटक, त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी आपला अहवाल सादर केला. कर्नाटकमध्ये येत्या एप्रिल-मे दरम्यान निवडणुका होणार असल्याने भाजपने या राज्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि मिझोरामचे अध्यक्ष मंगळवारी आपला अहवाल सादर करतील. बैठकीत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राजकीय प्रस्ताव मांडला. यामध्ये विरोधकांनी पंतप्रधान मोदींविरोधात प्रचारात अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.