जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन : ओमायक्रॉन बीएफ-7 हा नवा व्हेरिएंट : खबरदारी घेण्याचे आवाहन
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून आता बुस्टर डोस पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा ताप, सर्दी, खोकला असल्यास आर.टी.पी.सी.आर. चाचणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. चीनमध्ये वाढलेले कोरोनाचे प्रमाण लक्षात घेत भारतातही कोरोनासंदर्भातील कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.
चीनमध्ये पुन्हा झालेला कोरोनाचा उद्रेक पाहता भारतातही कोरोनासंदर्भात खबरदारी पाळण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणांकडून करण्यात येत आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत सर्व राज्यांना कोरोनासंदर्भातील दक्षता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.राज्य आरोग्य विभागाकडूनही या संदर्भात सर्व जिल्हा शल्य चिकित्सकांना सूचना देण्यात आल्या आहेत.जिह्यात या आधी प्रतिबंधात्मक स्वरुपाचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला होता. जिह्यात पहिला डोस घेण्याचे प्रमाण 100 तर दुसरा डोस घेण्याचे प्रमाण 99 टक्के आहे.या दोन डोसनंतर बुस्टर डोस घेणे आवश्यक होते. मात्र हे प्रमाण फक्त 50 टक्के आहे. आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे खबरदारी म्हणून सर्वांनी बुस्टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नुकताच चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा ओमायक्रॉन बी-एफ 7 हा नवीन व्हेरिएंट आढळला आहे. या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव भारतात होवू नये, यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळांवर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पुन्हा एकदा मास्कचा वापर अनिवार्य करण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खबरदारी आवश्यक
रत्नागिरी जिह्यात अद्याप कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळलेला नाही, मात्र नागरिकांनी खबरदारी म्हणून बुस्टर डोस घ्यावा. घाबरुन न जाता योग्य खबरदारी घ्यावी. ताप,सर्दी, खोकला असल्यास आर.टी.पी.सी.आर. चाचणी करुन घ्यावी. असे आवाहन डॉ. संघमित्रा फुले जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी यांनी केले आहे.