वॉर्ड क्र. 27 च्या नगरसेवकांकडून निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊन एक वर्ष उलटून गेले. पण अद्याप महापौर व उपमहापौर निवडणुकीचा मुहूर्त लागलेला नाही. नागरिक त्यांच्या समस्या आणि अडचणी सोडवाव्यात यासाठी नगरसेवक म्हणून आमच्याशी संपर्क साधतात. पण सभागृहच अस्तित्वात नसल्याने आमचाही नाईलाज झाला आहे. तेंव्हा लवकरात लवकर महापौर, उपमहापौर निवडणूक जाहीर करावी, अशा आशयाचे निवेदन वॉर्ड क्रमांक 27 चे नगरसेवक रवी साळुंखे यांनी प्रादेशिक आयुक्त मोहनराज यांना दिले आहे.
बुधवारी दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, सभागृह कधी अस्तित्वात येणार, असा प्रश्न लोक विचारत आहेत. निवडणूक होऊन वर्ष उलटून गेले.
इतक्या कालावधीमध्ये सभागृह अस्तित्वात येणे आवश्यक होते. परंतु अद्याप महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक झालेली नाही ही दुर्दैवाची बाब आहे.
तसेच पालिकेतील महापौरपद हे सामान्य महिलांसाठी खुले असल्याचे सांगण्यात येत आहे. ते नेमके सर्वांसाठी खुले आहे की नाही, याची माहिती स्पष्ट करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.