निवडणुकीत 15 – 10 मतांनी विजय : दिगंबर कामत-भाजपाला धक्का,भाजप गटाची आणखी 5 मते फुटली
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिका नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत आमदार दिगंबर कामत आणि भाजपाचे उमेदवार दामोदर शिरोडकर यांचा स्वतंत्र उमेदवार घनश्याम शिरोडकर यांनी पराभव केला. घनश्याम यांचा 15 विरूद्ध 10 मतांनी विजय झाला. या निकालामुळे कामत आणि भाजपाला धक्का बसला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या निवडणुकीत लक्ष घातले होते, तरीही हा धक्कादायक निकाल आला आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठावळे यांनी निर्वाचन अधिकारी म्हणून घनश्याम शिरोडकर विजयी झाल्याची घोषण??ा केल्यानंतर गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांनी जयघोष केला. गोवा फॉरवर्डचे 8 नगरसेवक तसेच भाजप गटातील नगरसेविका सुनीता पराडकर उघडपणे घनश्याम शिरोडकर यांच्यामागे राहिल्याने त्यांच्याकडे 10 नगरसेवकांचे पाठबळ होते व जादुई 13 च्या आकडय़ासाठी त्यांना आणखी तीन नगरसेवकांची गरज होती. मात्र त्यांना अतिरिक्त चक्क 5 मते पडली. त्यामुळे भाजपाची 5 मते फुटल्याचे उघड झाले आहे.
बुधवारी आमदार कामत यांनी भाजपात प्रवेश करण्यापूर्वी भाजपाच्या नगरसेविका पराडकर, कामिलो बार्रेटो, महेश आमोणकर यांनी घनश्याम शिरोडकर यांनी सादर केलेल्या उमेदवारी अर्जांना अनुमोदन दिले होते. त्यानंतर नगरसेविका पराडकर यांनी आपला पाठिंबा घनश्याम शिरोडकर यांना कायम ठेवताना त्या उघडपणे त्यांच्यामागे राहिल्या व मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला त्यांनी उपस्थिती लावली नव्हती. याव्यतिरिक्त आणखी 5 नगरसेवकांची मते घनश्याम शिरोडकर यांना मिळाल्याने भाजपाची 5 मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.
सदानंद नाईक यांनी घेतला अर्ज मागे
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार भाजप गटातील नगरसेवक सदानंद नाईक यांनी दामोदर शिरोडकर य?ांना पाठिंबा देत शुक्रवारी आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर दामोदर शिरोडकर आणि घनश्याम शिरोडकर यांच्यात सरळ लढत झाली असता वरीलप्रमाणे निकाल लागला.
निवडणूक कक्षात मोबाईल नेण्यास मज्ज्जाव
निर्वाचन अधिकारी कोठावळे यांनी निवडणूक कक्षात प्रवेश करताना नगरसेवकांना मोबाईल बाहेर ठेवण्यास भाग पाडले. क्रॉस व्होटिंग होऊ नये यासाठी नगरसेवकांकडून मोबाईल घेऊन मतदान केल्याचे चित्रण करण्यास भाजपाच्या नगरसेवकांना सांगितले होते अशी चर्चा पालिका आवारात सुरू होती. मात्र निर्वाचन अधिकारी कोठावळे मतदानाची गुप्तता राखणे कायद्याने बंधनकारक असल्याने नियमावर ठाम राहिल्यामुळे सुरक्षितरीत्या मतदान झाले.
मुख्यमंत्र्यांनी घातले होते लक्ष
मडगाव नगराध्यक्षपदाचा निकाल काय लागतो याकडे साऱयांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. आमदार दिगंबर कामत यांनी काँगेस सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या निवडणुकीत लक्ष घातले होते. मूळ भाजपाच्या 9 पैकी 8 तसेच आमदार कामत गटातील 7 मिळून 15 नगरसेवकांची बैठक मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत मडगाव रेस्ट हाऊसमध्ये गुरुवारी सायंकाळी उशिरा झाली होती. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केलेले सदानंद नाईक यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगण्यातप आले होते. तसेच आमदार कामत गटातील दामोदर शिरोडकर हे भाजपाचे अधिकृत उमेदवार राहणार असून त्यांना मतदान करावे असे नगरसेवकांना सांगण्यात आले होते. माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक व योगीराज कामत हे यावेळी उपस्थित होते.
भाजप नगरसेवकांना लगेच पणजीत बोलावणे
अविश्वास ठरावासाठी हालचालींना सुरुवात
भाजपाची पाच मते क्रॉस व्होटिंग होऊन घनश्याम शिरोडकर यांना मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही मते कोणाची फुटली याची खातरजमा करण्यासाठी भाजप नगरसेवकांना शुक्रवारी सायंकाळी पणजीत बोलावून घेतल्याचे सांगण्यात आले. मतदान गुप्त पद्धतीने झालेले असल्याने क्रॉस व्होटिंग करणाऱयांचा शोध घेणे अशक्य असले, तरी संशयाची सुई मूळ भाजप गटासह कामत गटातील काही नगरसेवकांकडेही वळलेली आहे.
आता भाजपतर्फे नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. अविश्वास ठरावावरील मतदान हात उंचावून होत असते. तेथे गुप्त मतदान घेण्यात येत नसल्याने क्रॉस व्होटिंगची शक्यता नसते. मात्र उघडपणे क्रॉस व्होटिंग होऊ शकते.
दरम्यान, पणजीत भाजप नगरसेवकांच्या सह्या घेण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली असून सोमवारी नगराध्यक्ष शिरोडकर यांच्यावर अविश्वास ठराव आणला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पणजीनंतर नगरसेवकांना जांबावलीत मडगावचे ग्रामदैवत श्री दामोदराच्या दर्शनास नेण्यात आले अशी माहिती मिळालेली आहे. पण तेथे काय प्रमाण करण्यात आले ते समजू शकले नाही.
हा श्री महालक्ष्मीचा कौल-प्रसाद : घनश्याम शिरोडकर
आपण स्वतंत्र उमेदवार म्हणून एकटा होतो. तरीही आज 15 नगरसेवकांचा आपणास पाठिंबा मिळाला. हा श्री महालक्ष्मीचा कौल-प्रसाद आहे, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकर यांनी व्यक्त केली. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर देवाने आपणास पाहिजे ते पाऊल टाक, आपला पाठिंबा आहे असा प्रसाद दिल्याची प्रतिक्रिया दिली होती. या पार्श्वभूमीवर शिरोडकर यांनी प्रतिक्रिया देताना हा टोला हाणला. त्यांनी आपणास मतदान केलेल्या सर्व नगरसेवकांचे तसेच फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी त्यांच्या गटातील नगरसेवक?ांचा पाठिंबा दिल्याने त्यांचे आभार मानले. आपण सर्वांना बरोबर घेऊन पालिकेचा गाडा हाकणार आहे. यासाठी सरकारच्या पाठिंब्याची गरज आहे. सोनसडय़ासह मडगाव शहराला भेडसावणाऱया सर्व समस्या सोडविण्यास आपले प्राधान्य राहील, असे घनश्याम शिरोडकर यांनी स्पष्ट केले.
भाजपाच्या घातकी राजकारणाचे हे पडसाद : सरदेसाई
मडगाव नगराध्यक्षपदी घनश्याम शिरोडकर यांची झालेली निवड हे बुधवारच्या राजकीय घडामोडींचे पडसाद आहेत. पितृपक्षात भाजपाने जे घातकी राजकारण केले त्याने गोमंतकीयांच्या भावना दुखावलेल्या असून त्याचे हे पडसाद आहेत. देव आमच्याबरोबर आहे हे यातून दिसून येते, अशी प्रतिक्रिया फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली. गोवा फॉरवर्डचा घनश्याम शिरोडकर यांना पूर्ण पाठिंबा आहे. त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्याविषयीच्या भावनाही या निकालास कारणीभूत आहेत. त्यामुळे भाजपाची मते फुटण्यास हातभार लागला, असे सरदेसाई म्हणाले. आपण व आमदार दिगंबर कामत यांनी भाजपाचा मडगाव पालिका मंडळात शिरकाव होऊ नये यासाठी आघाडी केली होती. आमदार कामत आता भाजपात गेले आहेत, पण ती भावना शिल्लक आहे, म्हणून हा निकाल आला आहे, असे सरदेसाई म्हणाले.