मडगाव नगराध्यक्षपद निवडणूक रंगतदार : भाजपला सेटबॅक, राजकीय घडामोडींना वेग
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेचे रिक्त नगराध्यक्षपद भरण्यासाठी निवड प्रक्रिया सुरू झाली असून मंगळवारी स्वतंत्र नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी चक्क तीन अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे ‘वेट अँड वॉच’ भूमिका घेतलेल्या भाजप गटाच्या नगरसेवकांनी शिरोडकर यांच्या अर्जांना अनुमोदन दिल्याने भाजपसाठी हा ‘सेटबॅक’ ठरला असल्याची चर्चा पालिका आवारात सुरू झाली आहे.
भाजप गटातील कामिलो बार्रेटो, सुनीता पराडकर आणि महेश आमोणकर यांनी शिरोडकर यांनी सादर केलेल्या तीन वेगवेगळया अर्जांना अनुमोदन दिले आहे. सोमवारी पालिका संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी शुक्रवार 16 रोजी मडगाव पालिकेचे रिक्त नगराध्यक्षपद भरण्यासाठी खास बैठक बोलाविली असल्याची नोटीस जारी केल्यानंतर मडगावातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी सायंकाळी भाजप नेते बाबू आजगांवकर, दामू नाईक, रूपेश महात्मे यांनी गटातील 9 नगरसेवकांची बैठक घेऊन आमच्याकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने ‘थांबा आणि पाहा’ अशी भूमिका घेऊया, पुढील निर्णय नंतर घेऊया, असे ठरविले होते.
भाजप नेत्यांना धक्का
मात्र वरील तीन नगरसेवकांनी भाजप नेत्यांच्या निर्णय पायदळी तुडवत शिरोडकर यांना अनुमोदन दिल्याने भाजपचे नेते उघडे पडले आहे. शिरोडकर यांना अनुमोदन दिलेले नगरसेवक आमोणकर यांची प्रतिक्रिया जाणली असता, शिरोडकर हे स्वतंत्र उमेदवार असल्याने आपण अनुमोदन दिले असल्याचे त्यांनी सांगितले. शिरोडकर यांना पाठिंबा न देता काँग्रेसचा उमेदवार आम्ही बिनविरोध निवडून आणणार होतो काय, असा उलट सवाल त्यांनी केला. शिरोडकर स्वतंत्र असल्याने ते पुढे भाजपातही येऊ शकतात, असे ते म्हणाले. भाजप गटातील ज्येष्ठ नगरसेवक सदानंद उर्फ पाकलो नाईक यांनी उमेदवारी अर्ज घेतला होता. मात्र त्यांच्या गटातील तीन नगरसेवकांनी स्वतंत्र उमेदवाराला अनुमोदन दिल्याने नाईक यांनी सदर अर्ज गुंडाळून ठेवण्यातच धन्यता मानली आहे.
काँग्रेस गट बैठकीत एकसंध राहण्याचे आवाहन
दुसरीकडे, काँग्रेसच्या सात नगरसेवकांची मंगळवारी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी बैठक घेतली. यावेळी सर्वांनी एकसंध राहून आपले उमेदवार दामोदर शिरोडकर यांच्यामागे ठामपणे उभे राहावे, फातोर्डा फॉरवर्ड गटाचा आम्हाला पाठिंबा असेल, असे स्पष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
फातोर्डा फॉरवर्डच्या बैठकीत विचार करण्याची सूचना
सोमवारी रात्री फातोर्डा फॉरवर्ड गटाच्या 8 नगरसेवकांची बैठक फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी घेतली होती. यावेळी काही नगरसेवकांनी आमदार कामत भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा असल्याने त्यांच्या गटाला पाठिंबा देण्यासंदर्भात दोनदा विचार करण्याची गरज व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
घनश्याम शिरोडकर हे स्वतंत्र उमेदवार असल्याने त्यांना काँग्रेस, गोवा फॉरवर्ड तसेच भाजप गटातील नगरसेवक अनुमोदन देऊ शकणार नसल्याची व भाजप गटातून अनुमोदन दिले गेल्यास फातोर्डा फॉरवर्ड त्यांना पाठिंबा देऊ शकणार नाही, अशी चर्चा चालू होती. मात्र सध्या अनुमोदन दिलेल्या तिन्ही नगरसेवकांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून शिरोडकर यांना पाठिंबा दिल्याचे म्हटले असल्याने समीकरणे बदलल्यास त्यांना फातोर्डा फॉरवर्डच्या 8 नगरसेवकांचा पाठिंबा मिळू शकतो.
क्रॉस व्होटिंगची शक्यता
मात्र काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डची पालिकेतील युती कायम असल्याने उभय गटांची संयुक्त बैठक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. युतीकडे 15 नगरसेवकांचे निर्विवाद बहुमत आहे. परंतु युतीचा उमेदवार कामत तसेच सरदेसाई यांच्या गटातील काही नगसेवकांच्या पचनी न पडल्याने क्रॉस व्होटिंगची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे, एकसंध राहून युती धर्म पाळला गेला व दामोदर शिरोडकर यांची नगराध्यक्षपदी वर्णी लावली, तरी आमदार कामत काँग्रेसमध्येच राहतील याची शाश्वती फातोर्डा फॉरवर्डच्या नगरसेवकांना नसल्याने सर्व घोळ निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र उमेदवार शिरोडकर यांचे पारडे सध्या वरचढ दिसत आहे. मात्र पुढील दोन-तीन दिवसांत कशा राजकीय घडामोडी घडतात त्यावरून चित्र स्पष्ट होणार आहे.
नगराध्यक्ष निवडीसाठी मडगाव पालिका मंडळाची खास बैठक शुक्रवार 16 रोजी सकाळी 11 वा. होणार आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठावळे यांची निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज 15 रोजी दुपारपर्यंत मुख्याधिकाऱयांच्या कार्यालयात देता येतील, असे पालिका संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी काढलेल्या नोटिसीत म्हटले आहे. लिंडन पेरेरा यांनी अलिखित समझोत्यानुसार 15 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पदाचा राजीनामा दिल्याने मडगाव पालिकेचे नगराध्यक्षपद रिक्त झाले आहे.
राजकीय संलग्नता बाजूला ठेवून आपल्याला पाठिंबा : शिरोडकर
गेल्या 28 वर्षांत मडगावची जी दयनीय अवस्था झालेली आहे ती थोडीफार जाग्यावर घालण्यासाठी आपण काही नगरसेवकांकडे नगराध्यक्षपदासाठी आपणास पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मंगवारी अर्ज भरताना तीन नगरसेवकांनी मला अनुमोदन दिले आहे. ते भाजप गटातील असले, तरी राजकीय संलग्नता बाजूला ठेवून स्वतंत्ररीत्या आपल्यास त्यांनी पाठिंबा दिला आहे, असे घनश्याम शिरोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.