Tarun Bharat

मराठी शाळांच्या कानडीकरणाचा घाट

खानापुरातील गोधोळी येथील मराठी शाळेत कन्नड शाळा सुरू करण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी /खानापूर

गोधोळी येथील मराठी शाळा कन्नड करण्याचा घाट उघडकीस आल्याने गोधोळी ग्रामस्थ व खानापूर तालुका विकास आघाडी यांच्यावतीने मंगळवारी गटशिक्षणाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.

गोधोळी येथील मराठी शाळा सातवीपर्यंत आहे. या शाळेत सात वर्गखोल्या असून 80 विद्यार्थी आहेत. मात्र तालुक्यातील मराठी शाळा कशा बंद करता येतील, यासाठीच गटशिक्षणाधिकाऱयांचे प्रयत्न सुरू आहे. तालुक्यातील अनेक शाळा विलीनीकरण करून कानडीकरण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोधोळी येथील मराठी शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये कन्नड शाळा सुरू करण्याचा डाव गटशिक्षणाधिकाऱयांनी सुरू केला आहे. दोन वर्गखोल्यांमध्ये कन्नड शाळा सुरू करण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱयांनी प्रयत्न चालविले आहेत. याला गोधोळी येथील पालक व एसडीएमसी कमिटीच्यावतीने विरोध करण्यात आला. मात्र गटशिक्षणाधिकाऱयांनी दोन खोल्यांमध्ये कन्नड शाळा सुरू करण्यासाठी तगादा लावला आहे.

याबाबत तालुका विकास आघाडीचे भरमाणी पाटील यांनी मंगळवारी गटशिक्षणाधिकाऱयांना निवेदन देऊन कानडीकरणाचा घाट न थांबविल्यास उग्र आंदोलन करू, असा इशारा दिला. घटनेच्या अधिकारानुसार प्रत्येकाला मातृभाषेत शिक्षणाचा हक्क असताना तालुका शिक्षणाधिकाऱयांनी जाणीवपूर्वक मराठी शाळांचे विलीनीकरण तसेच मराठी शाळा बंद करून त्या ठिकाणी कन्नड शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे, मराठी शाळेला शिक्षक न देणे अशा प्रयत्नातून मराठी शाळा कशा बंद होतील, याकडे लक्ष देत आहेत.

मराठी भाषा, संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न

तालुक्यातील मराठी संघटनांनी, मराठी पालकांनी, म. ए. समितीने तातडीने लक्ष देऊन वेळीच विरोध केला पाहिजे तसेच कानडीकरणाचा हा घाट उधळून लावला पाहिजे, अन्यथा खानापूर तालुक्यातील मराठी शाळा हळूहळू बंद पाडविल्या जातील व येथील मराठी भाषा, संस्कृती पूर्णपणे संपुष्टात येईल.

निवेदन देताना भरमाणी पाटील, सुमित कर्लेकर, संतोष कदम, पांडुरंग कुंभार, सागर चव्हाण, नागेंद्र कदम, कृष्णा महाजन, गंगाराम महाजन, मोहन खन्नूकर, ज्ञानेश्वर पाटील, चंद्रकांत गुरव, अतुल खन्नूकर, सुनील अष्टेकर, बाळकृष्ण मडवाळकर, प्रसाद कुंभार आदी उपस्थित होते.

सर्व मराठी भाषिकांनी एकत्र येऊन लढा द्यावा

तालुक्यातील मराठी शाळा कशा बंद पडतील यासाठी गटशिक्षणाधिकाऱयांनी प्रयत्न चालविले आहेत. काही शाळा कानडी कशा करता येतील, याचेही नियोजन सुरू आहे. या सर्व बाबतीत तालुक्यातील मराठी जनतेने जागृत राहून कर्नाटक सरकारचा हा कुटिल डाव हाणून पाडला पाहिजे, अन्यथा येत्या काही दिवसात हल्याळ व कारवारसारखी परिस्थिती होण्यास वेळ लागणार नाही. जर मराठी शाळा बंद पडल्या तर निश्चितच मराठी संस्कृती नष्ट होईल. यासाठी सर्व मराठी भाषिकांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.

– भरमाणी पाटील

Related Stories

साडेसतरा तास चालले गणेश विसर्जन सोहळा

Amit Kulkarni

निना, रॉजर्स स्पोर्ट्स क्लबची विजयी सलामी

Amit Kulkarni

ठिय्या आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार

Patil_p

शाळांचा विलंब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर नेणारा

Patil_p

झाडांमुळे उड्डाणपुलाच्या भिंतीला भगदाड पडण्याची शक्मयता

Patil_p

म्हशीने ठोकरल्याने दुचाकीस्वार ठार

Patil_p