आचरा/ प्रतिनिधी-
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकार सिंधुदुर्ग पुत्र मधुसूदन नानिवडेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला आचरे येथे ‘मधुरांजली’ या साहित्यिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मधुसूदन नानिवडेकर यांचा पहिला स्मृतिदिन ११ जुलै २०२२ ला येतो. त्याच्या पूर्वसंध्येलाच कोकण मराठी साहित्य परिषद,शाखा मालवणने आचरेत ‘मधुरांजली’ ह्या सोहळ्याचे आयोजन केले आहे.
हा कार्यक्रम रविवार दिनांक १० जुलै २०२२ रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत जामडुल रिसॉर्ट, बागजामडुल आचरे येथे संपन्न होईल. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. रुजारिओ पिंटो (केंद्रीय सल्लागार कोमसाप), उद्घाटक मान. जेरोन फर्नांडिस (जि.प .सदस्य आचरे मतदार संघ) हे असतील. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र आंगणे (उपशिक्षणाधिकारी जि.प.सिंधुदुर्ग) हे असणार आहेत.
हा कार्यक्रम आषाढी एकादशी दिवशी येत असल्याने ‘अक्षरांची एकादशी’ हा कोमसाप मालवणच्या ११ कवींच्या स्वरचित कवितांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम होणार आहे. यात मधुरा माणगावकर, अदिती मसुरकर, मंदार सांबारी, सुप्रिया सकपाळ, विजयकुमार शिंदे, सुगंधा गुरव, सदानंद कांबळी, दौलतराव राणे, सुरेंद्र सकपाळ, ऋतुजा केळकर आणि मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम होणार आहे
तसेच नानिवडेकर यांच्या ‘चांदणे नदीपात्रात’ या काव्यसंग्रहातील काही निवडक कवितांचे वाचन रामचंद्र कुबल आणि उज्वला धानजी हे करणार आहेत. आचरे बागजामडुल रिसॉर्ट हे मधुसूदन नानिवडेकर यांचे आवडते विसाव्याचे एकमेव ठिकाण होते. म्हणूनच प्रथम स्मृतीदिन त्याच ठिकाणी साजरा करावयाचे कोमसापने ठरविले. “या अक्षर सोहळ्याला सर्व नानिवडेकर प्रेमी आणि साहित्यिक काव्यप्रेमींनी बहुसंख्येने उपस्थित रहावे,” असे आवाहन सुरेश शामराव ठाकूर, अध्यक्ष कोमसाप मालवण यांनी केले आहे.