काही मनातलं, काही जनातलं’ लेखसंग्राहाचे प्रकाशन
प्रतिनिधी / फोंडा
दक्षिण गोव्याचे माजी खासदार व अनिवासी भारतीय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर यांच्या ‘काही मनातलं काही जनातलं’ या प्रासंगिक लेख संग्रहाचे प्रकाशन नुकतेच झाले. त्यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून खडपाबांध फोंडा येथील विश्व हिंदू परिषद सभागृहात हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, आमदार उल्हास तुयेकर, माजी आमदार दामू नाईक, फोंडय़ाचे नगराध्यक्ष रितेश नाईक, माहिती आयुक्त ऍड. विश्वास सतरकर व ऍड. नरेंद्र सावईकर हे उपस्थित होते. या लेखसंग्रहात नरेंद्र सावईकर यांनी समाजातील काही ज्वलंत विषय व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर तटस्थपणे लिहिले आहे. राजकीय प्रवासातील जीवनानुभवही त्यातून मांडलेले आहेत. कोरोना काळात अनेक व्यक्तीमधील सुप्तगुणांचे दर्शन घडले. याच काळात नरेंद्र सावईकर यांच्यातील लेखक पुढे आला, असे सदानंद तानावडे यावेळी बोलताना म्हणाले.
सुभाष शिरोडकर यांनी पुस्तकावर भाष्य करताना, हे पुस्तक समाजमनाचा वेध घेणारे व मुद्देसूद असल्याचे सांगून वाचकांनी आपल्या संग्रही ठेवण्यासारखे आहे. नरेंद्र सावईकर यांनी लेखन उर्जेचा फायदा गोव्यात लेखन चळवळ उभी करण्यासाठी करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. विनय तेंडुलकर यांनी हे पुस्तक म्हणजे नरेंद्र सावईकर यांच्या व्यक्तीमत्त्वामागील एक वेगळा पैलू असल्याचे सांगितले. नरेंद्र सावईकर यांनी एका पुस्तकावर न थांबता अजूनही लिहित राहावे, अशा शुभेच्छा उल्हास तुयेकर यांनी दिल्या. दामू नाईक म्हणाले, राजकारण हे माणूस ओळखण्याचे साधन आहे. सावईकर यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात वावरताना आलेले अनुभव अचूकपणे टिपताना विविध विषयांचा धांडोळा घेतलेला आहे. लेखक म्हणून ते इतिहासात नोंद राहतील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी तर फोंडा भाजपा मंडळाचे अध्य़क्ष विश्वनाथ दळवी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला भाजपाचे पदाधिकारी तसेच आजी माजी आमदार, कार्यकर्ते व नरेंद्र सावईकर यांचे हितचिंतक मोठय़ा संख्य़ेने उपस्थित होते.