वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुखापतीमुळे अल्पशा विश्रांतीनंतर यशस्वी पुनरागमन करणारा भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविलेला भाला लॉसेनमधील ऑलिम्पिक म्युझियमला भेट दिला आहे. त्याचे अस्तित्व युवा ऍथलीट्ससाठी प्रेरणादायक ठरेल, अशी आशा त्याने याप्रसंगी व्यक्त केली.
शनिवारी त्याने म्युझियमला भाला प्रदान केला, त्यावेळी ऑलिम्पिक सुवर्णविजेता नेमबाज अभिनव बिंद्राही उपस्थित होता. ‘ऑलिम्पिक म्युझियमला भेटून आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकताना वापरलेला भाला तेथे भेट देऊन सन्मानीत झाल्याची भावना मनात आहे. त्याच्या अस्तित्वाने युवा पिढीला प्रेरणा मिळत राहील आणि स्वप्न साकार करण्यासाठी त्यांच्याकडून कठोर परिश्रम घेतले जातील, अशी मला आशा वाटते,’ असे चोप्राने ट्विटच्या माध्यमातून सांगितले. याप्रसंगी अभिनव बिंद्राही सोबत होता, याबद्दलही त्याने आनंद व्यक्त केला.
2008 मधील बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने नेमबाजीत सुवर्णपदक मिळविण्याचा पराक्रम केला होता. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण मिळविणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू बनला होता. त्याची ही ‘यशस्वी’ रायफलदेखील ऑलिम्पिक हेरिटेज कलेक्शन म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी अशा अनेक ऑलिम्पिकजेत्यांच्या वस्तूंचे कलेक्शन करण्यात आले असून ऑलिम्पिक वारसा जपणे आणि नव्या पिढीला प्रेरित करणे, हा त्यामागील उद्देश आहे. ‘ऑलिम्पिक इतिहासातील अनेक संस्मरणीय क्षणांची साक्ष या म्युझियममधून मिळते, या ठिकाणाला भेट देता आली, ही भाग्याची बाब आहे. आपल्याकडून इतरांना प्रेरणा मिळत राहणे, हा प्रत्येक ऍथलीटचा एकप्रकारे सन्मानच असतो,’ असेही चोप्रा म्हणाला.
टोकियो ऑलिम्पिकचा विद्यमान चॅम्पियन असणाऱया चोप्राने त्या स्पर्धेत दुसऱया प्रयत्नात 87.58 मी. भालाफेक करीत सुवर्ण मिळविले होते. याशिवाय तो भारताचा या क्रीडाप्रकारातील विक्रमधारकही आहे. या स्पर्धेत ट्रक ऍन्ड फील्ड क्रीडा प्रकारात वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा तो भारताचा पहिला तर अभिनव बिंदानंतर वैयक्तिक सुवर्ण पटकावणारा दुसरा खेळाडू आहे.