पहिल्या वनडेत भारताचा 12 धावांनी निसटता विजय, ब्रेसवेलचे संस्मरणीय शतक, सँटनरचे अर्धशतक
द्विशतक व सिराजसह गोलंदाजांनी केलेल्या भेदक कामगिरीच्या बळावर भारताने पहिल्या वनडे सामन्यात झुंजार लढत देणाऱया
न्यूझीलंडवर केवळ 12 धावांनी निसटता विजय मिळवित तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. द्विशतक नोंदवणाऱया गिलला सामनावीराचा बहुमान मिळाला. दुसरा सामना शनिवारी रायपूर येथे होणार आहे.
भारताने निर्धारित 50 षटकांत 8 बाद 349 धावांचा डोंगर उभा केला. गिलचे हे सलग दुसरे शतक असून याआधी लंकेविरुद्ध शेवटच्या सामन्यात त्याने शतक (116) नोंदवले होते. तो भारताचा पाचवा द्विशतकवीर बनला आहे. याआधी तेंडुलकर, सेहवाग, रोहित शर्मा (3 द्विशतके), इशान किशन यांनी द्विशतके नोंदवली आहेत.
या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 49.2 षटकांत सर्व बाद 337 धावा जमविल्या. 29 व्या षटकात 6 बाद 131 अशी स्थिती असताना मायकेल ब्रेसवेल व मिशेल सँटनर यांनी 17 षटकांत 162 धावांची जलद भागीदारी करीत न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा निर्माण केल्या. सिराजने सँटनरला बाद करून ही जोडी फोडल्यानंतर ब्रेसवेलने एकाकी लढत करीत विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. पण शेवटच्या षटकात शार्दुल ठाकुरने त्याला पायचीत करून न्यूझीलंडचा डाव 337 धावांत संपुष्टात आणला. बेसवेलने संस्मरणीय शतक नोंदवताना 78 चेंडूत 12 चौकार, 10 षटकारांची आतषबाजी करीत 140 धावा झोडपल्या. त्याला साथ दिलेल्या सँटनरने 45 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह 57 धावा फटकावल्या. भारताच्या सिराजने 46 धावांत 4, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर यांनी प्रत्येकी 2, शमी व हार्दिक यांनी एकेक बळी मिळविला.
गिलचे द्विशतक
तत्पूर्वी, गिलने आपला दर्जा दाखवून देताना 149 चेंडूत 208 धावांची खेळी केली. त्याला इतरांकडून पुरेशी साथ मिळाली नाही. तरीही त्याने शेवटच्या षटकापर्यंत टिकून राहत भारताला चार सामन्यांत तिसऱयांदा त्रिशतकी मजल मारून दिली. 2018 मधील यू-19 विश्वचषक स्पर्धेत त्याने चमकदार प्रदर्शन करून सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यावेळीच त्याला भारताचा भावी स्टार असल्याचे म्हटले गेले होते. त्याने आपल्या या खेळीत 19 चौकार व 9 षटकार मारले. त्यापैकी सहा षटकार त्याने 150 धावा झाल्यानंतर फटकावले.
भारताने प्रथम फलंदाजी निवडल्यानंतर प्रारंभी भारतीय सलामीवीर व न्यूझीलंडचे गोलंदाज यांच्यात चांगली चुरस पहावयास मिळाली. भारताला पॉवरप्लेच्या पहिल्या दहा षटकांत बिनबाद 52 धावांपर्यंत मजल मारता आली. अधूनमधून चेंडू थांबून येत असल्याने फटकेबाजी करणे कठीण जात होते. कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा चांगली सुरुवात करूनही मोठी खेळी करू शकला नाही. त्याने 38 चेंडूत 34 धावा जमविल्या. त्याने या खेळीत हेन्री शिपलेला कव्हरवरून लोफ्टेड ड्राईव्हचा आणि प्रंटफूटवर लाँगलेगच्या देशेने अप्रतिम षटकार मारले. 13 व्या षटकात त्याने टिकनरला हवेतून फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण मिडॉनवर सँटनरने त्याचा झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली.
गेल्या चारपैकी तीन डावांत शतके नोंदवलेल्या कोहलीचे प्रेक्षकांनी जल्लोष करून जोरदार स्वागत केले. त्याने शानदार कव्हरड्राईव्हचा चौकार मारून सुरुवात केली. पण डावखुरा स्पिनर मिशेल सँटनरच्या एका अप्रतिम चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. ऑफस्टंपवरील किंचित वळलेल्या चेंडूला बॅकफूटवर खेळताना त्याचा त्रिफळा उडाला, तेव्हा त्याचाही विश्वास बसला नाही. त्याने 8 धावा जमविल्या. इशान किशनही फार वेळ टिकला नाही. फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर लॅथमने त्याचा यष्टीमागे झेल टिपला. 14 चेंडूत त्याने केवळ 5 धावा जमविल्या.
सूर्यकुमारने नेहमीप्रमाणे धावांचा वेग वाढविण्याचे काम केले. त्याने 26 चेंडूत चार वेगवेगळय़ा दिशेने चौकार लगावले. दरम्यान, दुसऱया बाजूने गिलने मायकेल बेसवेलला स्वीपचा चौकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. 45 धावांवर असताना यष्टिरक्षक लॅथमने त्याला यष्टिचीत करण्याची संधी वाया घालवली. हे जीवदान त्यांना बरेच महाग पडले. गिलने पेसर्सना पुलचे फटके मारले तर स्पिनर्सविरुद्ध पदलालित्य दाखवित धावा जमवल्या. एकेरी धाव घेत त्याने तिसरे वनडे शतक पूर्ण केले. शतक पूर्ण झाल्यावर त्याने टिकनरला मिडॉन-मिडविकेटच्या मधून शानदार फटका लगावला. सूर्याला 31 धावांवर डॅरील मिशेलने बाद केले.
गिलने नंतर हार्दिक पंडय़ासमवेत 74 धावांची जलद भागीदारी केली. हार्दिक मात्र विचित्र पद्धतीने बाद झाला. सँटनरला फटका मारताना हार्दिक चुकला, त्याचवेळी बेल्स पडल्यानंतर न्यूझीलंडने अपील केले. लॅथमच्या ग्लव्ह्जला लागून बेल्स पडल्या असाव्यात. पण लॅथमलाच त्याबाबत खात्री नव्हती आणि रिप्लेमध्येही ते स्पष्ट न झाल्याने तिसऱया पंचांनी हार्दिक बाद असल्याचा निर्णय दिला. गिलने नंतर षटकार ठोकत दीडशतक पूर्ण केले. यानंतर मात्र त्याने षटकारांची बरसातच केली. 49 व्या षटकात तीन षटकार ठोकत त्याने द्विशतक पूर्ण केले. त्याच्या फटकेबाजीमुळे भारताने शेवटच्या पाच षटकांत 57 धावा तडकावल्या. शेवटच्या षटकातील दुसऱया चेंडूवर उत्तुंग फटका मारताना तो झेलबाद झाला. न्यूझीलंडतर्फे शिपले व डॅरील मिशेल यांनी प्रत्येकी 2 तर फर्ग्युसन, टिकनर, सँटनर यांनी एकेक बळी मिळविले.
भारतातर्फे गिलच्या सर्वात जलद हजार धावा
द्विशतक नोंदवणारा शुबमन गिल वनडेमध्ये भारतातर्फे सर्वात जलद 1000 धावांचा टप्पा गाठणारा फलंदाज बनला आहे. त्याने 19 सामन्यांतील 19 व्या डावांत हा टप्पा पूर्ण करताना विराट कोहली व शिखर धवन यांना मागे टाकले.
जानेवारी 2019 मध्ये वनडे पदार्पण केलेला गिल सर्वात जलद हजार धावा करणाऱयांत संयुक्त दुसरे स्थान मिळविले आहे. पाकच्या इमाम उल हकनेही 19 डावांत हा टप्पा गाठला होता. पाकच्याच फखर झमानने सर्वात जलद हा टप्पा गाठण्याचा विक्रम केला असून त्याने यासाठी 18 डाव घेतले होते. कोहली व धवन यांनी 24 डावांत हा टप्पा गाठला होता.
संक्षिप्त धावफलक ः भारत 50 षटकांत 8 बाद 349 ः रोहित शर्मा 34 (38 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), गिल 208 (149 चेंडूत 19 चौकार, 9 षटकार), कोहली 8, इशान किशन 5, सूर्यकुमार यादव 31 (26 चेंडूत 4 चौकार), हार्दिक पंडय़ा 28 (38 चेंडूत 3 चौकार), वॉशिंग्टन सुंदर 12 (14 चेंडू), शार्दुल ठाकुर 3, कुलदीप यादव नाबाद 5, शमी नाबाद 2, अवांतर 13. गोलंदाजी ः शिपले 2-74, डॅरील मिशेल 2-30, फर्ग्युसन 1-77, टिकनर 1-69, सँटनर 1-56.
न्यूझीलंड 49.2 षटकांत सर्व बाद 337 ः फिन ऍलेन 40 (39 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), कॉनवे 10, निकोल्स 18, डॅरील मिशेल 9, लॅथम 24 (46 चेंडूत 3 चौकार), फिलिप्स 11, बेसवेल 140 (78 चेंडूत 12 चौकार, 10 षटकार), सँटनर 57 (45 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), अवांतर 19. गोलंदाजी ः सिराज 4-46, कुलदीप 2-43, शार्दुल 2-54, शमी 1-69, हार्दिक पंडय़ा 1-70.