उत्तर भारतात मंगळवार हा हनुमंताचा वार म्हणून मानला जातो. दक्षिण भारतात किंवा महाराष्ट्रात मात्र शनिवार हा मारुतीचा वार म्हणून ओळखला जातो. हनुमानाची मंदिरे आपल्याला अनेक स्थानी दिसून येतात. असे म्हटले जाते की भारतात शंकर या देवतेखालोखाल लोकप्रियता हनुमानाला आहे आणि त्याच्या मंदिरांची संख्याही शंकराच्या मंदिरांच्या खालोखाल आहे. मात्र, अशा या लोकप्रिय देवतेच्या दिल्लीतील एका मंदिराने ‘गिनीज बुक’ या विक्रम पुस्तिकेत स्थान मिळवून एक अनोखा विक्रम केला आहे. नुकतीच ही माहिती प्रसिद्ध झाली आहे.
हे मंदीर प्राचीन, अर्थात महाभारत काळापासूनचे आहे, असे मानले जाते. पांडवांनी जी पाच मंदिरे स्थापित केली त्यांपैकी ते एक असल्याची भावना आहे. 1 ऑगस्ट 1964 पासून या मंदिरात एका नव्या परंपरेचा प्रारंभ करण्यात आला. या दिवसापासून अद्यापपावेतो या मंदिरात अखंड 24 तास 12 महिने ‘श्रीराम जयराम जयजय राम’ या 13 अक्षरी मंत्राचा जप होत आहे. त्यात एक निमिषमात्रही खंड पडलेला नाही. यामुळेच या मंदिराचा समावेश गिनीज बुकमध्ये करण्यात आला आहे. या मंदिराला दिल्लीतील आणि दिल्लीबाहेरच्या पण दिल्लीत कार्यरत असलेल्या जवळपास प्रत्येक राजकीय नेत्याने भेट दिली आहे, हे याचे आणखी एक वैशिष्टय़ आहे. या मंदिराची सध्याची वास्तू आंबेर येथील महाराजा मानसिंग यांच्या पुढाकाराने सोळाव्या शतकात निर्माण करण्यात आली होती.