वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आंध्रप्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी गिरिधर अरामने यांनी संरक्षण सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच गिरिधर यांनी देशाला सुरक्षित आणि समृद्ध करण्याच्या दिशेने काम करण्याचे आश्वासन दिले आहे. 1988 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी गिरिधर हे मागील 10 दिवसांपासून संरक्षण मंत्रालयात ओएसडी पदावर तैनात होते.
संरक्षण सचिव पदावरून अजय कुमार हे 31 ऑक्टोबर रोजी निवृत्त झाले होते. अजय कुमार यांच्या जागी गिरिधर यांची नियुक्ती करण्यात आली होती. अजय कुमार हे तीन वर्षांच्या स्वतःच्या कार्यकाळानंतर निवृत्त झाले होते. यापूर्वी या पदाकरता त्यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाली होती.
गिरिधर अरामने यांनी यापूर्वी रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयात सचिव म्हणून काम पाहिले आहे. त्यापूर्वी कॅबिनेट सचिवालयात अतिरिक्त सचिव पदाचे त्यांनी काम पाहिले हेते. सुमारे 32 वर्षांच्या सेवेत गिरिधर यांनी आंध्रप्रदेशच्या चित्तूर तसेच खम्ममचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले आहे. याचबरोबर राज्य तसेच केंद्र सरकारमध्ये विविध जबाबदाऱया त्यांनी सांभाळल्या आहेत.
संरक्षण सचिवाचा पदभार मंगळवारी स्वीकारण्यापूर्वी गिरिधर यांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्धस्मारकाच्या ठिकाणी जात हुतात्म्यांना नमन केले आहे. हुतात्मा सैनिकांकडून प्रेरणा घेत भारताला सुरक्षित आणि समृद्ध करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने काम करणार असल्याचे गिरिधर यांनी म्हटले आहे.
सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये बीटेक आणि आयआयटी मद्रासमधून एमटेक केलेले गिरिधर यांच्यासमोर देशाच्या सशस्त्र दलांना आधुनिक शस्त्रास्त्रs उपलब्ध करण्यासह ड्रोन तसेच अन्य महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाने युक्त करण्याची जबाबदारी असणार आहे. याचबरोबर संरक्षण क्षेत्रात खासगी उद्योगाची भागीदारी वाढविण्याच्या दिशेने धोरणे राबवावी लागणार आहेत.