18 महिन्याच्या चिमुरडीला दुर्लभ आजार, घनदाट, सोनेरी अन् लांब केस
ब्रिटनमध्ये एका छोटय़ा मुलीची तुलना अल्बर्ट आइनस्टाइन आणि बोरिस जॉन्सन यांच्याशी केली जातेय. ही मुलगी कुशाग्र बुद्धीमुळे नव्हे तर स्वतःच्या डोक्यावरील केसांमुळे चर्चेत आली आहे. केवळ दीड वर्षे वय असलेल्या लाइला डेव्हिसच्या डोक्यावर घनदाट अन् सोनेरी रंगाचे केस असून त्यातून कंगवा फिरविता येत नाही. लाइला जन्मापासूनच अनकॉम्बेबल हेयर सिंड्रोमने पीडित आहे.
केस असामान्य स्वरुपात वाढणाऱया आणि केस नेहमी सरळ उभे राहणाऱया जगातील अशा 100 लोकांमध्ये लाइलाचा समावेश आहे. लाइला स्वतःच्या कुटुंबासोबत गेट ब्लेकनहम येथे राहते. तिचे वडिल केव्हिन आणि आई चारलोट्टी यांनी लाइलावर अलिकडेच औपचारिक उपचार करविले आहेत.
अनकॉम्बेबल हेयर सिंड्रोम
अनकॉम्बेबल हेयर सिंड्रोमची पहिल्यांदा ओळख 1973 मध्ये पटविण्यात आली होती. अमेरिकेच्या जेनेटिक अँड रेयर डिसिज इन्फॉर्मेशन सेंटरनुसार हा दुर्लभ डिसऑर्डर असून तो मानवी कवटीवर उगवणाऱया केसांशी संबंधित आहे. सर्वसाधारणपणे अशाप्रकारच्या केसांना स्ट्रा-कलर्ड हेअर किंवा सिल्व्हरी-ब्लॉन्ड म्हटले जाते. यातून कंगवा फिरविणे अत्यंत अवघड असते. अशाप्रकारच्या सिंड्रोमचे कारण जेनेटिक बदल असून जो पीएडीआय3, टीजीएम3 आणि टीसी एचएच जीनमध्ये परिवर्तनामुळे होतो.
उपचार नाही
या आजारावर जगात कुठलेच उपचार नाहीत. या आजारात मुलामुलींच्या डोक्यावर प्रारंभी स्ट्रॉबेरी रंगाचे चट्टे दिसू लागतात. त्यानंतर केस थेट समोरच्या दिशेने वाढतात आणि नेहमी सरळ उभे दिसून येतात. 5 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये देखील अशाच सिंड्रोमने पीडित मुलगी चर्चेत आली होती. शिलाह यि नावाच्या या मुलीचे केस सोनेरी, घनदाट आणि एकमेकांमध्ये अडकलेले असल्याने तिच्या आईवडिलांना मोठी मेहनत करावी लागत होती. त्यावेळी मुलीचे वय केवळ 7 वर्षे होते.