वार्ताहर /किणये
मराठीतून परिपत्रके द्या, या मागणीचे निवेदन वाघवडे भागातील नागरिकांच्या वतीने मार्कंडेयनगर, वाघवडे ग्रामपंचायतला मंगळवारी देण्यात आले. पी.डी.ओ. उपस्थित नसल्यामुळे क्लार्क आडव्याप्पा गवन्नावर यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले.
सीमाभागातील सरकारी कार्यालयांमधून मराठी परिपत्रके देण्यात यावीत, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आलेला आहे. जोपर्यंत मराठीतून परिपत्रके मिळत नाहीत तोपर्यंत आपली मोहीम चालूच ठेवायची या उद्देशाने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने तालुक्मयातील सीमाबांधवांना आपापल्या ग्रामपंचायतींना मराठीतून परिपत्रके देण्यासाठी निवेदन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार सोमवारीच बेळवट्टी ग्रामपंचायतीलाही निवेदन देण्यात आले. मराठी परिपत्रकांसाठी आता सर्व स्तरातून प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. अधिक तर ग्रामपंचायतींना निवेदने सादर करून त्याचा पाठपुरावा सरकारकडे केला जाणार आहे. वाघवडे भागात बहुतांशी प्रमाणात मराठी भाषिक आहेत. आपल्याला अन्य भाषेबद्दल द्वेष नाही. मात्र आमची मातृभाषा मराठी असल्यामुळे आम्हाला ग्रामपंचायतमधून मराठी भाषेतून परिपत्रके मिळावीत, अशी आमची मागणी आहे, असे एपीएमसी माजी सदस्य आर. के. पाटील, ग्रामपंचायत सदस्य रघु नाईक, ग्रामपंचायत सदस्य संतोष आंबोळकर यांनी निवेदन देताना सांगितले.
यावेळी जोतिबा आंबोळकर, सुभाष देसाई, पुंडलिक नाईक, सोपान नाईक, एम. टी. आंबोळकर, के. के. पाटील, वामन उंदरे, दयानंद देसाई, मनोहर पाटील, संतोष आंबोळकर, अरुण पाटील, उदय पाटील, शिवाजी गोरल, चांगाप्पा पाटील, गंगाधर केन्नुरकर, प्रदीप कुंडेकर, कल्लाप्पा गोरल, गुंडू पाटील, तुषार आंबोळकर, मुकुंद कुंडेकर, बापू होनगेकर, सर्जेराव नावगेकर आदी उपस्थित होते.