जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे निर्देश
कोल्हापूर प्रतिनिधी
जिह्यात कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क, शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी 10 हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी येथे दिले. तसेच या योजनेपासून कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविड टास्क फोर्स समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, आशिष पुंडपळ यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, कोरोनामुळे अनाथ झालेल्या 18 वर्षांखालील मुला-मुलींच्या शैक्षणिक खर्चासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून बाल न्याय निधीसाठी प्राप्त होणाया निधीचा वापर करण्यासाठी कार्यपद्धती दिली आह. यानुसार दहा हजारांच्या मर्यादेत प्रत्येक बालकाला फक्त एकदा लाभ देण्यात येईल. शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क, शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी कोरोनामुळे अनाथ बालकाला ही मदत देण्यात येईल.
महिला व बाल विकास अधिकारी पाटील म्हणाल्या, कोरोनामुळे बालकाचे आई किंवा वडील किंवा दोघांचे निधन झाले असल्यास संबंधित विद्यार्थी, पालक किंवा नातेवाइकांनी या योजनेसाठी महिला व बाल विकास विभागाकडे अर्ज सादर करावा. या योजनेसाठी कोल्हापूर जिह्याला 75 लाख रुपये निधी मिळाला आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत 664 बालकांना लाभ देण्यात आला आहे.
अर्जासोबत पालकांच्या मृत्यू दाखला, विद्यार्थ्यांच्या शाळेचा दाखला, निधी हवा असल्याचे शैक्षणिक कारण व त्याची कागदपत्रे, आधार कार्डची झेरॉक्स, बँक खात्याचा तपशील आदी कागदपत्रे सोबत सादर करावीत, असेही आवाहन पाटील यांनी केले.
दरम्यान वन स्टॉप सेंटर समितीच्या बैठकीत वन स्टॉप सेंटर योजनेची अधिकाधिक प्रसिध्दी करुन पीडित व अत्याचारग्रस्त महिलांना केंद्राचा लाभ देण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांना दिल्या.