प्रतिनिधी /पेडणे
विहिरीत पडलेल्या पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून म्हशीला जीवनदान दिले.बुधवारी 14 रोजी पहाटे अग्निशामक दलाला एका खोल विहिरीत, कोंडलवाडा पेडणे येथे विहिरीत म्हैस पडल्याची माहिती सतीश पालयेकर यांनी दूरध्वनीवरून अग्निशामक दलाला दिली. लगेच अग्निशामक दलाचे अधिकाऱयांसह जवान घटनास्थळी रवाना झाले. विहीर वीस ते पंचवीस मीटर खोल व पाणी असल्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना अथक परिश्रम घ्यावे लागले.
म्हैस गाभण असल्यामुळे अग्निशामक शामक दलाच्या जवानांनी चारी बाजूने दोर खांब बांधून सुरक्षितपणे म्हैस बाहेर काढली. या यशस्वी कामगिरीमुळे म्हाशीचे मालक सतीश पालयेकर यांनी अग्निशामक दलाच्या जवानांचे आभार मानले.
या मोहिमेत अग्निशामक दलाचे साहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर, हवालदार जयराम शेटगावकर, चालक प्रमोद गवंडी, प्रशांत सावळ देसाई, जवान, श्याम आरोंदेकर, केतन कामुलकर, आशीर्वाद गाड, संदेश पेडणेकर, विकास चौहान यांनी चांगली कामगिरी केली.