ऑनलाईन टीम/तरुण भारत
जगात मंकीपॉक्स (Monkey pox) आजाराचा फैलाव वाढत आहे. भारतातही मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. दिल्लीतहा रुग्ण सापडला आहे. तर जगातील ७० हून अधिक देशांत मंकीपॉक्स आजाराची साथ पसरल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शनिवारी जागतिक आणीबाणी जाहीर केली. मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक ही ‘एक असाधारण परिस्थिती’ असून आता जागतिक आणीबाणी लागू करण्याशिवाय पर्याय नसल्याचे ‘डब्ल्यूएचओ’ने स्पष्ट केले.
‘डब्ल्यूएचओ’चे महासंचालक ट्रेडॉस अधनॉम घेब्रेयेसस यांनी ‘डब्ल्यूएचओ’च्या आपत्कालीन समितीच्या सदस्यांमध्ये एकमत नसतानाही जागतिक आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. मंकीपॉक्सचा फैलाव वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने हा निर्णय घेतला आहे. तर संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेच्या प्रमुखाने सदस्यांमध्ये एकमत नसताना, अशी कृती करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हे ही वाचा : दिल्लीत ‘मंकीपॉक्स’चा शिरकाव, देशातील रुग्णसंख्या 4 वर
संपूर्ण जगभर एका साथीचा उद्रेक झाला असून हा रोग नव्या प्रकारांतून वेगाने पसरला आहे. त्याबद्दल आपल्याला अतिशय कमी माहिती आहे. अशा परिस्थितीला आंतरराष्ट्रीय आरोग्य नियम आणि निकष लागू होतात, असे ट्रेडॉस यांनी स्पष्ट केले. जागतिक आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया सोपी आणि सरळ नव्हती. कारण समितीच्या सदस्यांमध्ये मतभिन्नता होती, असेही त्यांनी कबूल केले.
तथापि, मंकीपॉक्स हा रोग अनेक दशकांपासून मध्य आणि पश्चिम आफ्रिकेच्या काही भागांत ठाण मांडून आहे. परंतु आफ्रिका खंडाबाहेर तो पसरल्याची माहिती मेपर्यंत कोणालाही नव्हती. युरोप, उत्तर अमेरिका आणि अन्यत्र या रोगाचे रुग्ण आढळल्यानंतर त्याची साथ पसरल्याचे लक्षात आले. ‘डब्ल्यूएचओ’ने जागतिक आणीबाणी जाहीर केल्यामुळे ‘मंकीपॉक्स’ची साथ ही असामान्य घटना असल्याचे स्पष्ट झाले. ही साथ आता अन्य देशांमध्येही वेगाने पसरण्याची शक्यता असून त्यासाठी जागतिक समन्वयाची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे.