अध्ययनाचा निष्कर्ष ः 1960-2019 या कालावधीतील दरडोई प्रमाण
वृत्तसंस्था / लंडन
मागील 60 वर्षांमध्ये जागतिक वनक्षेत्रात दरडोई 60 टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. वनक्षेत्र मोठय़ा प्रमाणात घटल्याने जैववैविध्याच्या भवितव्याला धोका निर्माण होत जगभरातील 1.6 अब्ज लोकांच्या जीवनावर याचा प्रभाव पडणार असल्याचे एका अध्ययनात म्हटले गेले आहे. इन्व्हॉयरमेंटल रिसर्च लेटर्स या नियतकालिकात हे अध्ययन प्रकाशित करण्यात आले आहे. या अध्ययनानुसार 1960-2019 या कालावधीत जागतिक वनक्षेत्र 81.7 दशलक्ष हेक्टरने घटले आहे.
फॉरेस्ट्री अँड फॉरेस्ट प्रॉडक्ट्स रिसर्च इन्स्टीटय़ूट या जपानमधील संस्थेच्या संशोधकांनी या अध्ययनाकरता जागतिक डाटाची मदत घेतली आहे. या अध्ययनात संशोधकांना जागतिक लोकसंख्या वाढण्यासह मागील 60 वर्षांमध्ये दरडोई वनक्षेत्र 60 टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात घटल्याचे आढळून आले आहे. हे प्रमाण 1960 मध्ये 1.4 हेक्टर होते. तर 2016 मध्ये ते 0.5 हेक्टरपर्यंत खालावले आहे.
वनक्षेत्रात होत असलेली घट जंगलांमधील पर्यावरणीय व्यवस्थेला प्रभावित करत आहे. यामुळे जंगलांमधील जैववैविध्यच संकटात सापडले आहे. तसेच याचा प्रभाव किमान 1.6 अब्ज लोकांवर पडणार आहे. विशेषकरून विकसनशील देशांमधील जंगलांवर विविध गरजांकडून अवलंबून असलेल्या लोकांवर याचा प्रभाव पडणार असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
उष्णकटिबंधीय तसेच अल्पउत्पन्न गटातील देशांमध्ये वनक्षेत्रांची हानी होत आहे. तर अधिक उत्पन्नगटातील देशांमध्ये वनक्षेत्रात वाढ होत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. वनक्षेत्र हानीबद्दलचा स्पॅटियल पॅटर्न असूनही विकसनशील तसेच गरीब देशांमध्ये वनक्षेत्र अधिक प्रमाणात कमी झाले आहे. याचमुळे वनक्षेत्र घटण्यासंबंधीचे अध्ययन अधिक विस्तृत स्वरुपात करण्याची गरज असल्याचे अध्ययनाचे मुख्य लेखक रोनाल्ड सी. इस्टोक यांनी म्हटले आहे. विकसित देशांमध्ये वनक्षेत्राची व्याप्ती वाढत आहे. तर विकसनशील देश विशेषकरून उष्णकटिबंधीय देशांमध्ये वनक्षेत्राची हानी अधिक होत असल्याचे इस्टोक म्हणाले.