निफ्टीही घसरणीसह बंद ः रिलायन्सचे समभाग सर्वाधिक नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवल बाजारात चालू आठवडय़ातील पहिल्या सत्रात सेन्सेक्स 365 अंकांच्या घसरणीसह बंद झाला आहे. यामध्ये जागतिक पातळीवरील बाजारांमध्ये झालेल्या विक्रीच्या दबावामुळे देशातील दिग्गज कंपन्यांचे समभाग प्रभावित झाल्याने सेन्सेक्स व निफ्टी दोन्हींमध्ये घसरणीचे सत्र राहिल्याचे दिसून आले.
मागील आठवडय़ामधील विविध घडामोडींच्या प्रभावामुळे ही घसरण स्थिती राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अभ्यासकांच्या मते विदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग विक्री सतत सुरू असल्याने व डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने शेअर बाजाराच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीमुळे सोमवारी दिवसअखेर सेन्सेक्स 364.91 अंकांनी घसरुन 54,470.67 वर बंद झाला आहे. मध्यंतरात सेन्सेक्स 917.56 अंकांनी नुकसानीत राहिला होता. तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 109.40 अंकांनी प्रभावित होत 16,301.85 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत. यासोबतच नेस्ले, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, टाटा स्टील, भारतीय स्टेट बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी आदीचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. तर पॉवरग्रिड कॉर्प, एचसीएल टेक, इन्फोसिस, मारुती सुझुकी आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग मात्र काहीअंशी लाभात राहिले आहेत.
जागतिक बाजरातील स्थिती
जागतिक बाजारातील वेगवेगळय़ा घडामोडेंमध्ये आशियातील जपानचा निक्की आणि दक्षिण कोरियातील कॉस्पी हे घसरणीसह बंद झाले असून चीनचा शांघाय मात्र वाढीसह बंद झाला आहे. हाँगकाँगचा बाजार बंद होता. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा मानक बेंट क्रूड 117 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचला आहे. जागतिक स्तरावर महागाई वाढत चालल्याचा प्रतिकूल परिणाम दिसून येतोय.