लादेन अन् अलजवाहिरीला भेटलो नसल्याचा दावा
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
संयुक्त राष्ट्रसंघाकडून जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आल्यावर अब्दुल रहमान मक्कीने पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगातून एक व्हिडिओ जारी केला आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप म्हणजे भारत सरकारकडून फैलावण्यात आलेल्या अफवा आहेत. ओसामा बिन लादेन आणि अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीला कधीच भेटलेलो नाही असा दावा मक्कीने या व्हिडिओद्वारे केला आहे.
अल-कायदा आणि इस्लामिक स्टेटशी संबंधित असल्याचा आरोप लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मक्कीने फेटाळला आहे. या दोन्ही दहशतवादी संघटनांची विचारसरणी मला मान्य नाही. अल-कायदा आणि इस्लामिक स्टेटकडून करण्यात आलेल्या सर्व हल्ल्यांची मी निंदा करतो असे त्याने म्हटले आहे.
पाकिस्तानने काश्मीरप्रश्नी घेतलेल्या भूमिकेवर मी पूर्णपणे सहमत आहे. जागतिक दहशतवादी घोषित करण्याकरता संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेने योग्य प्रक्रियेचे पालन केले नसल्याचा दावा मक्कीने केला आहे. इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ इस्लामाबादमध्ये काम करत असताना अल-कायदा आणि अफगाण कमांडरांना भेटल्याचा आरोप त्याने नाकारला आहे. मक्की हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील तुरुंगात 2019 पासून कथितरित्या कैद आहे.