पर्पल फेस्तचे झाले भागिदार : विविध कंपनींच्या प्रतिनिधींना आमंत्रण,पर्पल थिंक टँक सत्राचेही आयोजन
प्रतिनिधी /पणजी
गोवा चेंबर ऑफ कॉमर्स हे पर्पल फेस्तचे भागिदार झाले असून पर्पल फेस्तच्या माध्यमातून गोवा चेंबर कॉमर्स दिव्यांग व्यक्तींना रोजगारासाठी सर्व समावेश प्रणाली तयार करण्यास नेतृत्व करणार अशी माहिती गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे राल्फ द सोझा यांनी दिली आहे. पर्पल फेस्तच्या कालावधीत विविध कंपनींच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले असून फेस्तमध्ये सहभागी झालेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्याशी संवाद साधता येईल, असेही राल्प द सोझा यांनी सांगितले.
मंगळवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राल्फ द सोझा बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत सिद्धार्थ कुंकळीकर, राहुल गवस, गुरुप्रसाद पावस्कर, संजय आमोणकर, शांती राघवन व अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्य दिव्यांग आयुक्त कार्यालय, सक्षम इंडियाच्या सहकार्याने सरकारी आणि खासगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधीवर चर्चा करण्यासाठी पर्पल थिंक टँक सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या दिव्यांगांसाठी कार्य करणारे आयोग इनेबल इंडिया तसेच राज्यातील दिव्यांगांसाठी काम करणारे एनजीओ यांच्या संयुक्त विद्यमाने 7 जानेवारी पासून पर्पल फेस्तचे आयोजन करण्यात आले आहे.
उशिरा का होईना जीसीसीआय आता गोव्यातील उद्योगांमध्ये विविध कंपनींच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीमधून कुशल कामगारांना कामावर घेण्याबाबत अत्यंत गंभीर झाली आहे. आपण एकत्र येऊन व्यावसायिकांसह असा समाज निर्माण करू जिथे अपंगत्व नोकऱयांमध्ये अडथळा ठरणार नाही, असेही राल्फ द सोझा म्हणाले.
गोव्यात आयोजित केल्या जाणाऱया या फेस्तातूनच कॉर्पेरेट प्रतिनिधींना त्यांच्या संस्थांमध्ये सर्वसमावेशकता असण्याची गरज लक्षात येईल, असे सिद्धार्थ कुंकळीकर यांनी सांगितले. हे एक व्यासपीठ आहे जे आमच्या प्रतिभावन आणि कुशल दिव्यांग व्यक्तींना कामाच्या ठिकाणी समाजात उत्पादक होण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करू शकते, असेही कुंकळीकर म्हणाले.
हे फेस्त कंपन्यांना दिव्यांग व्यक्तींची निवड करण्यात, त्यांच्यातील कुशलता, त्यांचा जीवन प्रवास उलगडून देण्यात मदत करेल, असे शांती राघवन यांनी सांगितले. दिव्यांग व्यक्तींना उपजीविका सक्षम करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या दिशेने हे महत्वपूर्ण पाऊल आहे, असेही राघवन म्हणाल्या.