दोन याचिकांवर खंडपीठात होणार सुनावणी
प्रतिनिधी /पणजी
येत्या रविवारी दि. 19 जून रोजी होऊ घातलेल्य गोवा डेअरीच्या नव्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे.
या निवडणुकीला सांतआंद्रे येथील सहकारी दुग्ध उत्पादन संस्थेचे अध्यक्ष रमेश एडायडन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. सध्या सुरु असलेल्या सदोष निवडणूक प्रक्रियेवर बोट ठेवले असून निवडणुकप्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी केली आहे. एडायडन यांनी गेल्या आठवडय़ातच उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.
फळदेसाई यांची हस्तक्षेप याचिका
याचिकेवर काल सोमवारी सुनावणी झाली. या याचिकेला माजी चेअरमन राजेश फळदेसाई यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. त्यावरही आज न्यायालय पुन्हा सुनावणी करतेवेळी निर्णय घेणार आहे. गोवा डेअरीसाठी दि. 19 रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी जे मतदार निश्चित केलेले आहेत त्यासंबंधित सोसायटीचे चेअरमनसाठी मतदार म्हणून निश्चित केलेली तारीख नेमकी कोणती? असा सवाल न्यायमूर्ती लोढा यांनी केला असता दि. 31 मार्च 2021 मार्च 2021 ची यादी नक्की केल्याचे सहकार खात्यामार्फत सांगण्यात आले.
मतदानाचा हक्क कुणाला?
प्राप्त माहितीनुसार मार्च 2022 मध्ये सुमारे 8 ते 10 सोसायटय़ांचे चेअरमन बदलले. त्यामुळे आता जे चेअरमन झालेले आहेत त्यांना मतदानाचा हक्क प्राप्त होत नाही. जे 2021 मध्ये अध्यक्ष होते ते आता अध्यक्ष नसल्याने त्यांनाही मतदानाचा हक्क प्राप्त होत नाही. न्यायालय या याचिकेवर निवडणुकीला स्थगिती देणार की निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होतो हे आज निश्चित होईल.